चार राज्यांना भुकंपाचा झटका!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय भुखंडातील हिमालय हा भुकंपप्रवर्तक क्षेत्र मानला जातो. याच क्षेत्रात सोमवारी झालेल्या भुकंपामुळे बिहार, बंगाल, सिक्कीम आणि आसाम ही चार राज्य हादरली आहेत. या भुकंपाची नोंद 5.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भुकंपाच्या या अचानक आलेल्या झटक्यामुळे या चारही राज्यातील नागरिक घाबरले आहेत.
भुकंपाचं केंद्र हे सिक्कीम राज्यातील राजधानी गंगटोकपासून 25 किलोमीटर अंतरावर होतं. भारत आणि भुटान या दोन देशांच्या सिमांवर हे केंद्र आहे. सोमवारी रात्री 8 वाजून 49 मिनिटांच्या सुमारास हे भुकंपाचे झटके बसले. एवढंच नाही तर याआधी देखील सोमवारी हिमाचल प्रदेशच्या चंपा आणि लाहौल या भागात भुकंपाचेे झटके जाणवले होते.
या भुकंपानंतर स्थानिक नागरिक घाबरले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. लागोपाठ झालेल्या या दोन भुकंपामुळे केंद्र सरकारदेखील खडबडून जागं झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही राज्यातील मुख्यमंत्र्याची फोनवरून बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भुकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
दरम्यान, बिहारमध्ये या भुकंपाचा फटका जास्त बसला असल्याची माहिती मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.