आता मोबाईल ने ATM मधून काढता येणार पैसे!

मुंबई (वृत्तसंस्था) आता लवकरच तुम्हाला डेबिट कार्डशिवाय मोबाईल ने एटीएममधून (ATM) पैसे काढता येणार आहेत. एटीएम बनवणारी कंपनी एनसीआर कॉर्पोरेशनने (NCR Corporation) युपीआय प्लॅटफॉर्मवर(UPI) आधारित पहिले ‘इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) सॉल्युशन’ लाँच केले आहे. याच्या माध्यमातून युपीआय अॅपद्वारे मोबाईल ने क्यूआर कोड स्कॅन करुन एटीएममधून पैसे काढता येतात.
ही खास सुविधा असलेले एटीएम इंस्टॉल करण्यासाठी सिटी युनियन बँक आणि एनसीआर कॉर्पोरेशनने भागीदारी केली आहे. सिटी युनियन बँकेने आतापर्यंत आपले 1500 पेक्षा जास्त एटीएम या सेवेनुसार अपग्रेड केले आहेत. सध्या या सेवेद्वारे एकावेळी जास्तीतजास्त 5 हजार रुपये काढता येतात, अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.
“एनसीआर कॉर्पोरेशनसोबत आम्ही भागीदारी केली असून त्यामुळे आमच्या ग्राहकांना आता डेबिट कार्ड नसताना युपीआय अॅपचा वापर करुन एटीएममधून पैसे काढता येतील”, असं सिटी युनियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एन कामकोडी यांनी सांगितलं. तर, एनसीआर कॉर्पोरेशनचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक आणि दक्षिण पूर्व आशियाचे क्षेत्रीय उपाध्यक्ष नवरोज दस्तूर यांनीही वृत्तसंस्था पीटीआयला याबाबत माहिती दिली.