वर्ष अखेरी,महागाईचा भडका; खिशाला फटका!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात 1 डिसेंबरपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करतील असे अनेक बदल लागू केले गेले. अनेक गोष्टींमध्ये झालेले दरवाढीचे हे बदल सर्वसामान्यांवर परिणाम करणार आहेत. आज महिन्याच्या पहिल्या तारखेपासून लागू होणार्या या बदलांबद्दल जाणून घ्या सविस्तर..
▶️ आगपेटी भडकली: तब्बल 14 वर्षानंतर आगपेटीची (माचीस) किंमत 1 रुपयांनी महागणार आहे. पाच प्रमुख आगपेटी उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींनी एकमताने आगपेटीची MRP 1 रुपयावरून 2 रुपये करण्याचा निर्णय 1 डिसेंबरपासून लागू केला आहे. याआधी 2007 मध्ये ही किंमत 50 पैशांवरून 1 रुपया करण्यात आली होती.
▶️ सिलिंडर महागला: व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2101 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात ही किंमत 2000.50 रुपये होती. मात्र, घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.
▶️ टीव्ही पाहताना.. 1 डिसेंबरपासून स्टार प्लस, कलर्स, सोनी आणि झीसारख्या चॅनेलसाठी 35 ते 50% जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. सोनी चॅनल पाहण्यासाठी 39 रुपयांऐवजी 71 रुपये प्रति, झी चॅनलसाठी 39 रुपयांऐवजी 49 रुपये प्रति महिना, तर Viacom18 चॅनलसाठी 25 ऐवजी 39 रुपये मोजावे लागणार आहेत. या किंमतीत कमी-अधिक फरकही होऊ शकतो.
▶️ मोबाईल चालवणं महाग: मोबाईल सेवा पुरवणाऱ्या एअरटेल, व्होडाफोन व जिओ या कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन्स महाग केले आहेत. सामान्यांना इंटरनेट तसेच टॉक टाईम रिचार्ज करताना वाढलेल्या दरांचा फटका बसेल.
▶️ क्रेडिट कार्ड: एसबीआय क्रेडिट कार्ड 1 डिसेंबर 2021 पासून सर्व EMI खरेदी व्यवहारांवर 99 रुपये प्रक्रिया शुल्क व कर द्यावा लागेल. ही प्रोसेसिंग फी क्रेडिट कार्ड ईएमआय विरुद्ध केलेल्या खरेदीवर कार्ड जारीकर्त्याद्वारे आकारलेल्या व्याजाच्या रकमेव्यतिरिक्त आहे. यानंतर इतर क्रेडिट कार्ड कंपन्याही असा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
▶️ युएएन आधारशी लिंक करणं गरजेचं!
युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) 30 नोव्हेंबरपर्यंत आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक होते. जर तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत तसे केले नसेल, तर 1 डिसेंबरपासून तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान बंद केले जाईल.