रुग्णाचा मृत्यू झाला म्हणून डॉक्टर बेजबाबदार ठरत नाही:सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) देशात सध्या रुग्णाचे काही बरेवाईट झाल्यास त्याचा सगळा दोष डॉक्टरवर ढकलण्याची मानसिकता निर्माण झाली आहे असंही न्यायालयाने म्हटलं. रुग्णांवर उपचार करताना त्याच्या आय़ुष्याची खात्री कुठलाच डॉक्टर देऊ शकत नाही, ते फक्त त्यांच्यापरीने सर्वोत्तम उपचार देण्याचा प्रयत्न करू शकतात असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आहे.
उपचारावेळी रुग्ण दगावल्यास त्याबद्दल डॉक्टरांना दोषी ठरवता येणार नाही असंही न्यायालयाने म्हटलं. सध्या रुग्णाचे काही बरेवाईट झाल्यास त्याचा सगळा दोष डॉक्टरवर ढकलण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये रुग्णांचे नातेवाईक मृत्यू झाल्याचं स्वीकारण्यास तयार नसतात. एका प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या पीठासमोर झाले. यात न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि व्ही रामासुब्रमण्यम यांनी सुनावणी केली.
मुंबई रुग्णालय आणि वैदकीय संशोधन केंद्राच्या याचिकेवर सुनावणीवेळी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आय़ोगाने दिलेला आदेश फेटाळून लावला. या आदेशात डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांना 14.18 लाखांची भरपाई देण्यास सांगण्यात आलं होतं.
न्यायालयाने या प्रकरणी सर्व रेकॉर्ड आणि बाजू समजून घेतल्यानतंर म्हटलं की, हे एक असं प्रकरण आहे जिथं रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याआधी गंभीर होता. मात्र सर्जरी आणि उपचारानंतर रुग्ण जर जिवंत राहिला नसता तर त्याला डॉक्टरांची चूक म्हणता येणार नाही. हा डॉक्टरांचा बेजबाबदारपणा म्हणू शकत नाही.
तक्रारदाराने म्हटलं होतं की, सर्जरी एका डॉक्टरने केली होती त्यामुळे तो एकटाच रुग्णाच्या उपचारासाठी जबाबदार असेल. न्यायालयाने ही चुकीची मानसिकता असल्याचं मत नोंदवलं. रुग्णालयात असताना एका डॉक्टरकडून रुग्णाशेजारी बसून राहण्याची अपेक्षा करणं हे अती आहे. फक्त डॉक्टर परदेशात गेल्यानं त्याला बेजबाबदार ठरवता येणार नाही असंही न्यायालायने म्हटलं.
न्यायाधीशांनी असंही म्हटलं की, सुपर स्पेशलायजेशनच्या सध्याच्या युगात एक डॉक्टर एका रुग्णाच्या सर्व आजारांवर उपचार नाही करू शकत. प्रत्येक आजारासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञाकडून उपचार गरजेचे आहेत. रुग्णालय आणि डॉक्टरांना वैद्यकीय बेजबाबदारपणासाठी दोष ठरवणारा आयोगाचा निष्कर्ष हा कायद्यानुसार भक्कम नाही.
23 वर्षांपूर्वी दिनेश जयस्वाल यांना 22 एप्रिल 1998 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर जवळपास दोन महिने उपचार सुरु होते. मात्र 12 जून 1998 मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयाचे त्यावेळी बिल 4.08 लाख रुपये इतके झाले होते. तेव्हा दिनेश यांच्या नातेवाईकांनी आरोप केला होता की, गँगरिनच्या ऑपरेशननंतर बेजबाबदारपणामुळे हे झालं. डॉक्टर परदेशात गेले होते आणि आपत्कालीन ऑपरेशन थिएटर उपलब्ध नव्हते.