‘संत्री विकून शाळा बांधणाऱ्यास मिळाला पद्मश्री’!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत सरकारकडून प्रदान करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कार सोहळ्यामध्ये यंदा 7 पद्मविभूषण, 16 पद्मविभूषण आणि 118 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. एक नाव यंदा दिसून आलं, ते म्हणजे ‘हरेकाला हजाब्बा’ असं होय. हरेकाला हजाब्बा हे मूळचे कर्नाटकचे असून संत्री विकणारा म्हणून काम करणारे हरेकाला हजाब्बा हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एकाचे मानकरी ठरलेत.
▶️ संघर्षाची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी..!
‘हरेकाला हजाब्बा’ हे एक फळविक्रेते असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांना यंदा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. फळविक्री करत असल्याने हजाब्बा यांना स्थानिक भाषांचं ज्ञान फार उत्तम आहे. एकदा एक परदेशी दाम्पत्य हरेकाला यांच्याकडे संत्री विकत घेण्यासाठी आले होते, पण हरेकाला यांना फक्त स्थानिक भाषा येत असल्याने त्यांना परदेशी दाम्पत्याची भाषा समजली नाही. भाषा न समजल्याने ते दाम्पत्य संत्री न खरेदी करताच निघून गेलं.
हरेकाला यांना विक्री झाली नाही यापेक्षा आपण इंग्रजीत संवाद साधू शकलो नाही याचं खूप वाईट वाटलं. मात्र हजाब्बा यांनी आपल्या गावातील येणाऱ्या पिढीला अशा गोष्टीचा सामना करावा लागू नये म्हणून प्राथमिक शाळा असणं गरजेची असल्याची जाणीव त्यांना झाली. संत्री विकून फक्त 150 रुपये कमावणाऱ्या हजाब्बा यांनी गावामध्ये शाळा उभारण्यासाठी पैसे साठवायला सुरूवात केली. हजाब्बा यांनी ज्या गावात शाळा नव्हती तिथे लहान मुलांसाठी प्राथमिक व माध्यमिक शाळा उभारली. त्या शाळेत सुरुवातीला मुलांनी यावं म्हणून ते साफसफाई ते विद्यार्थ्यांसाठी उकळलेल्या पिण्याच्या पाण्याच्या सोईपासून सर्व काम सुरुवातीच्या दिवसांमध्ये करायचे.
शाळेत सुरुवातीला फक्त 28 विद्यार्थी यायचे. पण विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यावर जागा कमी पडू लागली मग पुन्हा निश्चय करून एक लहानशी शाळा बांधली गेली. एवढेच नाही तर सध्या ते विश्वविद्यालय उभारण्याच्या तयारीत आहे. आता मँगलोर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात हजाब्बा यांची जीवनगाथा शिकवण्यात येते.
▶️ हरेकाला हजाब्बा यांची पुरस्काराच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया:
“गृह मंत्रालयाकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन आला. पुरस्कार जाहीर झाला यावर विश्वासच बसत नाही. पद्मश्री पुरस्कार मिळेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. खूप आनंद झाला आहे”, अशी प्रतिक्रिया हरेकाला हजाब्बा यांनी पुरस्काराच्या घोषणेनंतर दिली होती. आता हरेकाला हजाब्बा 2012 पासून आपल्या गावात महाविद्यालय सुरू करण्यासाठी झटत आहेत. हजाब्बा यांचं राहणीमान साधं आहे. ते पुरस्कार सोहळ्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यांच्या साधेपणासाठी लोक त्यांचं कौतुक करत आहेत. विश्वासाच्या जोरावर आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी पद्मश्रीपर्यंत झेप घेतली आहे.