क्रूझ पार्टी आयोजक काशीफ खानला वानखेडेंनी अटक का केली नाही ?- ना.नवाब मलिक

मुंबई (वृत्तसंस्था) क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाला असला तरी महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील वाद काही थांबायचे नाव घेत नाही. या प्रकरणात नवाब मलिक यांनी आज नवीन खुलासा केला. ज्या क्रूझवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्या पार्टीचा आयोजक काशीफ खान होता. काशीफ खान फॅशन टीव्हीचा भारताचा प्रमुख आहे. काशीफ खाननेच क्रूझवर लोकांना निमंत्रित केले होते, असा आरोप मलिक यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी क्रूझवर डान्स करताना एका दाढीवाल्याचा उल्लेख केला होता, ती व्यक्ती काशीफ खानच असल्याचे सांगितले जाते.
नवाब मलिक यांनी ड्रग्ज पार्टी प्रकरणात आज नवीन खुलासे केले. काशीफ खान नावाचा हा व्यक्ती समीर वानखेडे यांच्या अत्यंत जवळचा आहे. आर्यन खानसह आठ लोकांना एनसीबीने क्रूझवरून अटक केली होती. परंतु काशीफ खान हा आपल्या प्रेयसीसह क्रूझवर पार्टी करताना, डान्स करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला, असे मलिक म्हणाले. मलिक यांनी व्हिडीओही शेअर केला आहे.
काशीफ खानकडेही ड्रग्ज होते, परंतु समीर वानखेडे यांनी त्यांना अटक केली नाही, असे सांगतानाच नवाब मलिक यांनी काशीफ खानवर गंभीर आरोपही केले. काशीफ खान हा ड्रग्जचा धंदाही करतो आणि क्रूझवर सेक्स रॅकेटही चालवतो. काशीफ खानचे समीर वानखेडेंशी चांगले संबंध आहेत, त्यामुळेच समीर वानखेडेंनी त्याला अटक केली नाही, असेही मलिक म्हणाले.
समीर वानखेडे आणि त्यांची पहिली पत्नी शबाना कुरैशी यांचे छायाचित्र प्रसिद्ध केल्याच्याबाबत विचारले असता मलिक म्हणाले की, आपण समीर वानखेडेंची पहिली पत्नी शबाना कुरैशी यांची परवानगी घेतली होती. त्यानंतरच छायाचित्र सार्वजनिक केले. समीर वानखेडे यांच्या दिवंगत आईबद्दल आपण कधीही कोणतीही टिप्पणी केली नाही, असेही मलिक म्हणाले. समीर वानखेडेंची दुसरी पत्नी क्रांती रेडकर यांच्याबद्दलही आपण कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे कुटुंबाची बदनामी करत असल्याचा आरोप निराधार असल्याचे मलिक म्हणाले.
▶️ भाजप नेते उघडे पडतीलः
पोपट पिंजऱ्यात बंद होणार आहे, त्यामुळे तो न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहे, असे मलिक म्हणाले. भाजप नेत्यांकडून समीर वानखेडेंचा वापर करून घेतला जात आहे. समीर वानखेडे तुरूंगात गेल्यावर भाजपच्या अनेक नेत्यांचे चेहरे उघडे पडतील. ड्रग्जच्या नावावर बॉलीवूडला बदनाम केले जात आहे. केंद्र सरकारने त्याची योजना आधीच तयार केली आहे. मुंबईची फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात शिफ्ट करण्याचा डाव आहे, असेही मलिक म्हणाले.