आर्यन खानला अखेर जामीन मंजूर!

मुंबई (वृत्तसंस्था) येथील क्रुझ ड्रग्ज प्रकरणात गेल्या 25 दिवसांपासून ‘एनसीबी’च्या ताब्यात असलेल्या आर्यन खानला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आर्यनसह अरबाज मर्जंट व मूनमून धमेचा यांनाही जामीन मंजूर करण्यात आला.
हायकोर्टाच्या निर्णयामुळे अभिनेता शाहरुख खानसह त्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. मात्र, तरीही आर्यनला आजची रात्र जेलमध्येच काढावी लागणार आहे. कारण, न्यायालयाची निकालाची प्रत उद्या (ता. 29) मिळणार आहे. त्यामुळे आर्यनची उद्याच आर्थर रोड कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.
मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर गेल्या तीन दिवसांपासून आर्यनसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती. अखेर कोर्टाने आज आर्यनसह अन्य दोन आरोपींनाही जामीन मंजूर केला.
‘एनसीबी’च्या वतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी जामीन देण्यास मोठा विरोध केला. तर आर्यनच्या बाजूने भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर होते.
स्माॅल कॉन्टिटी, कट नव्हता आणि अशा प्रकरणात एका वर्षाची शिक्षा होते. आर्यन आणि अरबाज जहाजावरील कुणालाही ओळखत नव्हते. त्यामुळे या प्रकरणात कट असल्याचे म्हणता येणार नाही. अशा प्रकरणात जामीन दिला जात असल्याचे आर्यनच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले.
▶️ या अटींवर जामीन
साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे, आदी शर्तीवर आर्यनला जामीन देण्यात आल्याचे वकिलांनी सांगितलं. मात्र, जामिनाची रक्कम समजू शकली नाही.
आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर ‘एनसीबी’चे अधिकारी समीर वानखेडे यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी मीडियाने गराडा घातला. मात्र, ‘नो कमेंट’ असे बोलून वानखेडे निघून गेले.