68 वर्षांनी एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समूहाकडे!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्जात आकंठ बुडालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची मालकी अखेर टाटा सन्स कंपनीनेच मिळविली. याबाबतची अधिकृत घोषणा केंद्र सरकारने आज (ता. 8) केली. एअर इंडियासाठी टाटा समूहाने तब्बल 18000 कोटींची बोली लावली.
जे.आर.डी. टाटा यांनी 1932 मध्ये ‘टाटा एअरलाइन्स’ची स्थापना केली होती. 1953 मध्ये तिचे राष्ट्रीयीकरण झाले. मात्र, गेल्या काही वर्षांत या ‘महाराजा’ची अवस्था वाईट झाली होती. एअर इंडियावर तब्बल 38366.39 कोटी रुपयांचे कर्ज झाले होते.
अखेर मोदी सरकारने 2017 मध्ये ‘एअर इंडिया’च्या खासगीकरणाला मंजुरी दिली. सरकारने 2018 मध्ये ‘एअर इंडिया’ विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. त्यानंतर सरकारने जानेवारी-2020 मध्ये पुन्हा निर्गुंतवणूक प्रक्रिया सुरू केली. ‘एअर इंडिया’ला विकलं नसतं, तर सरकारकडे तिला बंद करावे लागले असते.
▶️ तब्बल 68 वर्षांनंतर स्वगृही
अनेकांनी ही कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्यात टाटा समुहाने एअर इंडियासाठी सुमारे 18000 कोटींची सर्वाेच्च बोली लावली. त्यामुळे तब्बल 68 वर्षांनंतर पुन्हा एकदा टाटा समूहाकडे एअर इंडियाची कमान देण्यात आलीय.
टाटा समूहाने 18000 कोटींना ‘एअर इंडिया’ची खरेदी केलीय. पैकी 15 टक्के रक्कम केंद्र सरकारला, तर उर्वरित रक्कम कर्जफेडीसाठी वापरली जाणार असल्याचे सांगण्यात आले.