पेट्रोल आणि डिझेलचा पुन्हा भडका; भाववाढीचा ग्राहकांना फटका!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. डिझेल लागोपाठ चौथ्या दिवशी महागलं आहे. तर तीन आठवड्यानंतर पेट्रोलचाही भडका उडाला आहे. देशात भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सर्वाधिक आहेत.
गेल्या 22 दिवसांपासून पेट्रोलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलबरोबरच पेट्रोलच्या दरातही वाढ केली. देशभरात पेट्रोलचा दर 20 ते 22 पैशांनी वधारला आहे. तसेच डिझेलच्या दरात गेले सलग चार दिवस वाढ करण्यात येत असून, आज डिझेल 25 पैशांनी महागले आहे.
▶️ पेट्रोल -सध्या पेट्रोल 20 ते 22 पैशांनी महाग झाले आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 107.47 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल 101.47 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव 99.15 रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल 101.87 रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव 109.85 रुपयांवर गेला आहे.
▶️ डिझेल– गेल्या चार दिवसांमध्ये डिझेलचे दर तीनवेळा वाढले आहेत. त्यामुळे डिझेल 70 पैशांनी महागले आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी 24 सप्टेंबरला डिझेलच्या दरात 20 पैसे, 26 सप्टेंबरला 25 पैसे आणि आज 25 पैशांची वाढ केली आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव 97.21 रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल 89.57 रुपये लिटर झाला आहे. चेन्नईत 94.17 रुपये लिटर आणि कोलकात्यात डिझेलचा भाव 92.67 रुपये प्रती लीटर इतका आहे. तर, भोपाळमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक असून, तो 98.45 रुपये प्रती लीटर झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 3 वर्षांतील विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. ब्रेंट क्रूडचे दर 80 डॉलर प्रति बॅलरच्या आसपास पोहचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. त्यामुळे दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.