दिवसातून फक्त 5 ग्रॅम मीठ खा; जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला

जिनिव्हा (वृत्तसंस्था) मीठाशिवाय अन्न एकदमच बेचव लागते, याबाबत कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. परंतु आपल्या जेवणाला चव देणारे हेच मीठ थोडे जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचे काय दुष्परिणाम होतात, हे तुम्हाला माहीत आहे का? जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केलेल्या एका अभ्यासात जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे दरवर्षी जगात ३ दशलक्ष लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही संख्या कमी करण्यासाठी आता डब्ल्यूएचओने लोकांना दिवसातून फक्त पाचच ग्रॅम मीठ खाण्यास सांगितले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या या नियमामुळे २०२४ पर्यंत मीठाचा वापर ३० टक्क्यांनी कमी होईल, असे मानले जात आहे. शरीरात पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण संतुलित राहणे आवश्यक असते. कमी पोटॅशियम आणि जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन केल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते. अन्नामध्ये जास्त प्रमाणात मीठ असेल तर रक्तदाब, ह्रदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. हाडेही ठिसूळ होतात, असे तज्ज्ञ सांगतात.
शरीरात निरोगी प्लाझ्मा तयार करण्यासाठी मज्जातंतूचे आरोग्य सुधारण्यासाठी मीठाचे सेवन आवश्यक मानले जाते. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार बहुतांश लोक दररोज सरासरी ९ ते १२ ग्रॅम मीठ खातात. मीठाचा वापर शिस्तबद्ध पातळीवर कमी केल्यास जागतिक पातळीवर २.५ दशलक्ष मृत्यू रोखता येऊ शकतात, असा डब्ल्यूएचओचा अंदाज आहे.
▶️ मीठाविषयी समज-गैरसमजः
मीठाच्या अभावाबद्दल लोकांमध्ये असलेल्या काही समज आणि गैरसमजाबद्दलही डब्ल्यूएचओचे स्पष्टीकरण दिले आहे. घाम आल्यानंतर मीठ जास्त प्रमाणात खावे, असा बहुतांश लोकांचा गैरसमज आहे. मात्र ते पूर्णतः चुकीचे आहे. घाम आल्यानंतर फक्त हायड्रेशनची गरज असते. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने कोणत्याही वयातील व्यक्तीचा रक्तदाब वाढू शकतो, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.