भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री!

अहमदाबाद(वृत्तसंस्था) गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी अखेर भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. भाजप विधिमंडळाच्या बैठकीत भुपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमत झाले. त्यामुळे पाटीदार समाजाकडे गुजरातचे मुख्यमंत्रिपद गेलं असून, सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे.
विजय रुपाणी यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती. गुजरातमध्ये 2022 मध्ये निवडणुका होत आहेत. गुजरातमधील पटेल समाजाची नाराजी, तसेच कोरोना काळात रुपाणी यांना आलेले अपयश, यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींनी रुपाणी यांचा राजीनामा घेतल्याचे बोलले जाते.
दरम्यान, रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदी कोणाची निवड होते, याकडे लक्ष लागले होते. उपमुख्यमंत्री नितीन पटेल, मनसुख मांडवीया आणि पुरुषोत्तम रुपाला यांची नावे चर्चेत होती. या पार्श्वभूमीवर भाजप विधिमंडळाची आज (रविवारी) बैठक झाली. त्यात भाजपने भूपेंद्र पटेल यांच्या हाती गुजरातची कमान देण्याचा निर्णय घेतला.
▶️ भूपेंद्र पटेल यांचा परिचय-
गुजरातच्या घाटलोदिया मतदारसंघातून भूपेंद्र पटेल विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत वासुदेवभाई पटेल यांचा पराभव केला होता. पाटीदार समाजाचे भूपेंद्र पटेल हे रुपाणी सरकारच्या मंत्रीमंडळातही होते. दीर्घ काळापासून ते संघाशी संबंधित आहेत.