ठेवीवरील नियमांमध्ये मोठा बदल; रिझर्व्ह बॅंकेचे नवीन निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) बॅंका वा सहकारी संस्थांमधील नागरिकांच्या ठेवीबाबतच्या (एफडी) नियमांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे बॅंकेत एफडी करण्यापूर्वी बदलेले नियम माहिती असणे गरजेचे आहे, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकताे.
▶️ असा आहे नवा नियम..
ठेवीचा मॅच्युरिटी काळ पूर्ण झाल्यानंतर तुम्ही रकमेवर दावा न केल्यास, त्यावर कमी व्याजदर मिळेल. बचत खात्यावरील रकमेला मिळणाऱ्या व्याजाप्रमाणेच हे व्याज असेल, असे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने दिले आहेत.
सध्या ठेवीवर ५ टक्क्यांहून अधिक व्याज मिळते, तर बचत खात्याचा व्याजदर ३ ते ४ टक्के आहे. हा नियम व्यावसायिक, स्मॉल फायनान्स बँका, सहकारी बँका आणि इतर स्थानिक बँकांनाही लागू असणार आहे.
▶️ जुना नियम असा होता..
पूर्वीच्या नियमानुसार, ठेवीचा मॅच्युरिटी काळ पूर्ण झाल्यावरही तुम्ही पैसे न काढल्यास, अथवा त्यावर दावा न केल्यास बँकेकडून ठेव त्याच कालावधीसाठी पुढे वाढविण्यात येत असे; परंतु आता बॅंका परस्पर तसे करणार नाहीत.
दरम्यान आता मॅच्युरिटी पिरियड संपल्यावर तात्काळ पैसे काढून घ्यावेत, किंवा एफडी पुढे चालू ठेवण्यासाठी बॅंकेत जावे लागणार आहे, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.