‘ट्विटर’चा केंद्र सरकारला विरोध; नवे नियम स्वीकारण्यास नकार!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या कंटेंटवर लक्ष ठेवण्यासाठी खास अधिकारी नेमण्याची सूचना केली होती. त्यासाठी दिलेली तीन महिन्यांची मुदत 26 मे रोजी संपली, तरी काही सोशल मीडिया कंपन्यांनी सरकारच्या आदेशाचे पालन केलेले नाही.
सरकारच्या नव्या आयटी नियमानुसार सोशल मीडिया कंपन्यांना ‘चीफ कम्प्लायन्स ऑफिसर’, ‘नोडल काँटॅक्ट पर्सन’ आणि ‘रेसिडेंट ग्रिव्हान्स ऑफिसर’ नेमावे लागणार आहेत. एखाद्या कंटेंटबद्दल तक्रार आल्यास 24 तासांत त्याची दखल घेऊन सोडवणूक करावी लागणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत ‘गुगल’, ‘फेसबुक’, ‘व्हॉट्स अॅप’ यांनीच नवीन नियमानुसार आयटी मंत्रालयाला आवश्यक माहिती पुरवली आहे. मात्र, ‘ट्विटर’ने केंद्र सरकारच्या आदेशाला कचराकुंडी दाखवताना, खास अधिकारी नेमण्याबाबत कोणतीही माहिती आयटी मंत्रालयाला दिलेली नाही. त्यामुळे भारतातील ‘ट्वीटर’ सेवा बंद होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या या नव्या नियमानुसार, 50 लाखांहून अधिक युझर्स असलेल्या सोशल मीडिया कंपन्या या नियमांच्या कक्षेत येतात. मार्च-2021च्या आकडेवारीनुसार, भारतात व्हॉट्स अॅपचे 39 कोटी, ‘स्टॅटिस्टा’ या रिसर्च फर्मच्या जानेवारी-2021च्या आकडेवारीनुसार, फेसबुकचे भारतात सर्वाधिक म्हणजे 32 कोटी युझर्स आहेत.
जानेवारी 2021च्या आकडेवारीनुसार ट्विटरचेही भारतात 1.75 कोटींहून अधिक युझर्स आहेत. ट्विटरने थेट केंद्र सरकारशी पंगा घेतल्याने त्यांची भारतातील सेवा अडचणीत आली आहे.