शंभर रुपयांच्या नोट संदर्भात झाला हा निर्णय!

मुंबई (वृत्तसंस्था) नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनात रंग-बेरंगी नोटा आल्या. मात्र, त्या जास्त काळ टिकत नसल्याचेही समोर आले आहे. पाण्यात भिजल्या वा खिश्यात चोळामोळा झाल्यास या नोटा लवकर खराब होतात. मात्र, आता ही काळजी मिटणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 100 रुपयांच्या ‘वॉर्निश’ लावलेल्या नोटा चलनात आणणार आहे. ही नोट फाटू शकणार नाही. तसेच तिला कापताही येणार नाही. अनावधानाने खिशात राहिली, तरी तिचा चोळामोळा होणार नाही, तसेच ती पाण्यातही भिजणार नाही.
रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, सध्या प्रायोगिक तत्त्वावर या नोटा चलनात आणल्या जाणार आहेत. त्याचा प्रयोग यशस्वी झाल्यावर हळूहळू वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणल्या जातील आणि जुन्या नोटा व्यवहारातून बाद केल्या जातील.
सध्या जांभळ्या रंगाची 100 रुपयाची नोट चलनात आहे. ‘वॉर्निश’ केलेल्या 100 रुपयांच्या नव्या नोटाही जांभळ्या रंगातच असतील. त्यांची डिझाईन आताच्या 100 रुपयांच्या नोटेप्रमाणेच असेल. मात्र, त्या सध्याच्या नोटांपेक्षा दुप्पट टिकाऊ असतील.
▶️ एक अब्ज नोटांची होणार छपाई-
सध्याच्या 100 रुपयांच्या नोटेचा सरासरी कालावधी अडीच ते तीन वर्षांचा आहे. मात्र, ‘वॉर्निश’ केलेल्या या नव्या नोटा साधारण साडेसात वर्षे टिकतील. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला या एक अब्ज नोटा छापण्यास मान्यता दिली आहे.