केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; दीड कोटी कर्मचाऱ्यांना लाभ!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरमहा 105 ते 210 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्याचा फायदा दीड कोटी कर्मचार्यांना होणार आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व संस्थांमधील कर्मचारी, रेल्वे व्यवस्थापन, खाणकाम, तेल उत्पादन आणि प्रमुख बंदर येथील सरकारी कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू होणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून ही वाढ लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ होईल.
मुख्य कामगार आयुक्त डीपीएस नेगी म्हणाले, की “महागाई भत्त्यामध्ये दरमहा 100 टक्के वाढ केली आहे. त्यानुसार दरमहा 210 रुपये महागाईभत्यात वाढ केली आहे. त्याचा फायदा कंत्राटी आणि प्रासंगिक कामगारांनाही होणार आहे.”
कोरोनामुळे 2020 मध्ये केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता स्थिर करण्यात आला होता. महागाई भत्ता, महागाई सवलत 1 जुलै 2021 पासून परत सुरु करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने मार्चमध्येच जाहीर केले होते. त्यानुसार 1 जुलैपासून ही वाढ करण्यात आली आहे.
▶️ तीन हप्ते बाकी
वाढीव महागाई भत्त्याचा लाभ 65 लाख निवृत्तीवेतनधारक आणि 52 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळेल. मात्र, महागाई भत्त्याचे तीन हप्ते 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 हे केंद्रीय कर्मचार्यांच्या खात्यात कधी येतील, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.