लम्पी व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना मिळणार नुकसान भरपाई!

मुंबई (वृत्तसंस्था) काही दिवसांपासून राज्यातील जनावरांवर लम्पी चर्मरोगाचे संकट आले आहे,यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे
‘लम्पी’ चर्मरोगाचा प्रादुर्भावाने जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
लम्पी व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, संबंधित शेतकरी वा पशुपालकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांनुसार राज्य शासनाच्या निधीतून भरपाई दिली जाणार आहे, तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासाठी संबधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे.
जिल्हा नियोजन समित्यांनी 2022-23 मधील उपलब्ध निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक लस, औषधी, साधनसामुग्रीवर हा निधी खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांच्या भरतीबाबत चर्चा करण्यात आली. राज्यस्तरीय पशूधन पर्यवेक्षकाची 286 पदे, तसेच जिल्हा परिषद स्तरावरील 873, अशी एकूण 1159 रिक्त पदे बाह्य स्रोताद्वारे भरली जाणार आहेत.