अमेरिकेतील नोकरी सोडून विनायकने जिल्हाधिकारी व्हायचं स्वप्न केले पूर्ण!

अहमदनगर (वृत्तसंस्था) येथील विनायक नरवडे या युवकाने यूपीएससीत घवघवीत यश मिळवलं आहे. त्याला या परीक्षेत देशात ३७ वी तर महाराष्ट्रात २ री रँक मिळाली आहे. अमेरिकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून जिल्हाधिकारी व्हायचं, यासाठी यूपीएससी परीक्षा देण्याचं विनायकने ठरवलं आणि दुसर्याच प्रयत्नात त्याला हे घवघवीत यश मिळवता आलं.
विनायकने दहावीपर्यंतचं शिक्षण अहमदनगरच्या आठरे पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर पुण्यातील प्रेमराज सारडा महाविद्यालयातून त्याने अभियांत्रिकीची पदवी संपादन केली.
उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्याला जाण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी त्याला चांगल्या पगाराची नोकरीदेखील मिळाली. परंतु अधिकारी व्हायची इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना, यामुळे त्याने ही नोकरी सोडून यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली.
२०१५ पासून विनायकने या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. खाजगी क्लासेसवर जास्त अवलंबून न राहता, त्याने स्वयंअध्ययनावर जास्त फोकस केला. यासाठी त्याने अनेक माध्यमांचा आधार घेऊन अभ्यासाचे मटेरियल गोळा केले. या साऱ्याच्या बळावर विनायकने २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेची प्रभावीपणे अभ्यासाला सुरुवात केली.
त्याला दुसऱ्याच प्रयत्नात हे घवघवीत यश मिळवता आलं. त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यात त्याच्या यशामुळे आनंदाश्रू दाटून आले.
विनायकने ८ तास नोकरी करून, रोज ६ ते ७ तास अभ्यासही केला. त्याच्या या यशात त्याचं कुटूंब आणि मित्रपरिवाराची त्याला साथ लाभली. यामुळेच त्याला हे यश मिळवता आलं असं तो सांगतो. “तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपले लक्ष्य निश्चित करावे. ते गाठताना यश अपयश येऊ शकते.
हे गृहीत धरून प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार ठेवावे. ज्यामुळे अपयशाने खचून जाण्याची वेळ येणार नाही.” असा संदेशही त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.
