अँटीव्हायरल गोळी करणार कोराना मृत्यूचं प्रमाण कमी;अमेरिकन कंपनीने केलाय दावा!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना लसीकरणामुळे कोरोनाबाधित होण्याचा व मृत्यू होण्याचा धोका फारच कमी होतो, त्यामुळे सर्वांना लसी घेण्याचे आवाहन सरकारकडून वारंवार केलं जात आहे. आता कोरोना विरोधी गोळी (Antiviral pill) तयार करण्यात देखील शास्त्रज्ञांना यश आलंय.
▶️ कोरोनाचा धोका होणार कमी
या अँटीव्हायरल गोळीच्या क्लिनीकल ट्रायलमध्ये या गोळीचे चांगले परिणाम पाहायला मिळाले आहेत. कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा आणि मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी ही अँटीव्हायरल गोळी प्रभावी असल्याचं दिसलं.
अमेरिकेच्या Merck आणि Ridgeback Biotherapeutics या कंपन्यांनी तयार केलेल्या या औषधाचे कोविड-19 अति संसर्गजन्य समजल्या जाणाऱ्या डेल्टा विषाणूवर देखील चांगले परिणाम दिसून आले आहेत. अमेरिकेतील स्थानिक वृत्तसंस्थांच्या माहीतीनुसार, चाचणीच्या निकालांच्या आधारे क्लिनिकल ट्रायलनंतर लवकरात लवकर हे औषध बाजारात येणार आहे.
अमेरिकेमध्ये या गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळावी म्हणून लवकरच FDA कडे अर्ज करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले. जर या गोळीला मान्यता मिळाली तर कोरोनावरील जगातील पहिले तोंडावाटे घेतले जाणारे औषध ठरणार आहे.
▶️ तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत काय?
तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये ही गोळी घेतलेल्या 7.3 टक्के रुग्णांना 29 दिवसांनी हॉस्पिटलाईज करावे लागले. या गोळीचे अमेरिका, युरोप, जपान, साऊथ आफ्रिका, तैवान सारख्या देशांतील 170 शहरांमध्ये चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या गोळ्या घेतलेल्या रुग्णांपैकी 14 टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे, लठ्ठ, मधुमेही, हृदय विकार असलेल्या रुग्णांवरही या गोळीची चाचणी घेण्यात आली आहे.