ऑनलाईन पेमेंट पद्धतीत जानेवारी 2022 पासून होणार बदल!

मुंबई (वृत्तसंस्था) जलद व्यवहारासाठी ऑनलाईन शॉपिंग पोर्टलकडे कार्डधारकाचे डिटेल्स सेव्ह असतात. त्यातून युजरचा डेटा लीक हाेऊन अनेकदा फ्रॉड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी ‘आरबीआय’ने 1 जानेवारी 2022 पासून कार्ड टोकेनायजेशन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाईन पेमेंटसाठी ही टोकन सिस्टम असेल. त्यात व्यवहारादरम्यान कार्ड नंबर, सीवीवीचा वापर होणार नाही. त्या जागी टोकन नंबर जनरेट केला जाईल. त्यामुळे कार्डधारकाची माहिती ‘थर्ड पार्टी’कडे सेव्ह होणार नाही.
▶️ टोकन पद्धती कशी असेल..?
▪️ व्हिजा, मास्टरकार्ड, रुपेकार्ड सारख्या सेवा देणाऱ्या कंपन्या ग्राहकांचा कार्ड नंबर, सीवीवी व इतर डिटेल्सच्या जागी 16 अंकी नंबर जारी करतील. तो ग्राहकांच्या कार्डशी लिंक असेल.
▪️ ऑनलाईन पेमेंट करताना कार्ड डिटेल्स देण्याऐवजी 16 अंकी नंबरचे डिटेल्स द्यावे लागतील. त्याद्वारे पेमेंट होईल. केवळ बँक किंवा कार्ड जारी करणाऱ्या कंपनीकडेच युजरचे कार्ड डिटेल्स असणार.
▶️ टोकन असे मिळेल
टोकेनायजेशन सर्विस अनिवार्य नाही. युजर इच्छेनुसार ते वापरू शकतात. आपल्या कार्डसाठी टोकन जनरेट करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्या आधारे कार्ड कंपनी टोकन जनरेट करेल. या सर्विससाठी युजरला कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत.