बैलपोळा- कृतज्ञता भावनेचा सण!
असा सण ज्यात देव नाही, धर्म नाही, जात नाही, पंथ नाही.
असा सण ज्यात कोणी जिंकले नाही, कोणी हरले नाही, कोणी मेले नाही, कोणी मारले नाही.
असा जण ज्यात पूजा थोरांची नाही , मोठ्यांची नाही, गुरूंची नाही, शिष्यांची नाही.
रोज ज्याच्यासोबत शेतात जायचं, ज्याच्या मानेवर जू टाकून शेत कसायचं, सोबतच मातीत घाम जिरवायचा आणि शेवटी त्याच मातीत मिसळायचं..
त्याच नाव ठेवलेलं असतं प्रत्येक शेतकऱ्याने. त्याच्याबद्दल घरात गप्पागोष्टी होतात. त्याच्याशी नातं असतं, सख्ख आणि जवळचं. त्याच्यासोबत भावना गुंतलेल्या असतात, प्रेम , आपुलकी आणि आदराच्याही.
आदराची भावना! हो. आमच्या घरी “रेंड्या” नावाचा बैल होता. गोल शिंगांचा, करड्या रंगाचा. आणला तेव्हा उंच तरणाबांड आणि रुबाबदार होता. त्याने कधीच काठी टोचू दिली नाही की कधी शेपटीला हात लावू दिला नाही. शेवटी म्हातारा झाला होता, मानेवर गाठ झाली होती तेव्हाही सगळी ताकद एकवटून काम करायचा. दुसऱ्या बैलाच्या कधीच मागे पडला नाही, शेवटपर्यंत. अनेकदा कामचुकार, ” पाट्या टाकू” लोक, कर्मचारी ,अधिकारी भेटतात, तेव्हा मला “रेंड्या” आठवतो. त्या जितराबाची कामाबद्दलची निष्ठा खरंच जास्त होती असे वाटते. त्याचाबद्दल आदर वाटायचा तो आठवतो, दुणावतो.
नवीन पिढीला ट्रॅक्टरमुळे या भावनांची ओळख कदाचित होणार नाही. शहरी भागातील लोकांना ही गुंफण कदाचित पोहोचणार नाही. पण एक मात्र कळेल, हा एक सण वेगळा आहे. शेतकरी मनापासून साजरा करतो, फक्त रूढी परंपरा म्हणून नाही करत. सकाळी चरायला घेऊन जाणे, अंघोळ घालणे, शिंगे तासने त्यांना नवा रंग लावणे, मोरख्या, शिलदा, शेलखांड (दोर) नवे लावणे, मिरवणूक काढणे, देवळासमोर पूजा करणे, घरासमोर पुरणपोळीचा नेवैद्य खाऊ घालणे, आरतीने ओवाळणे हे सगळं मनापासून आणि आनंदाने असतं.
कृतज्ञता व्यक्त करण्याचा वर्षातला हा एक दिवस. अशा एक एक दिवसांनी, सणांनी, भावनांनी संस्कृती बनते.? डॉ.उज्वलकुमार चव्हाण
संयुक्त आयकर आयुक्त,मुंबई
