जयंती विशेष: महात्मा जोतीराव फुले

0

आज महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा जीवन कार्याची माहिती.
महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स. १८८८ या साली मिळाली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. २४ सप्टेंबर १८७३ रोजी, त्यांनी आपल्या अनुयायांसह, सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यात सर्व जाती धर्मातील लोकांनीं एकत्रित येऊन उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी काम केले.

महात्मा जोतीराव फुले जीवन परिचय

टोपणनाव: जोतीबा, महात्मा
जन्म:११ एप्रिल १८२७,कटगुण सातारा
मृत्यू:नोव्हेंबर २८, इ.स. १८९० पुणे, महाराष्ट्र
संघटना:सत्यशोधक समाज
प्रमुख स्मारके:भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे
प्रभाव:थॉमस पेन आणि शिवाजी महाराज
प्रभावित:डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील:गोविंदराव शेरीबा फुले
आई:चिमणाबाई फुले
पत्नी:सावित्रीबाई फुले
अपत्ये:यशवंत फुले ( दत्तक )

‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.

▶️ बालपण आणि शिक्षण:-
ज्योतीबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना ‘सेंद्रिय बुद्धिवंत’ असे संबोधले आहे.[२] जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा ‘बीजमती’ हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले. त्यातील एक “नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन हं, कैसे सूद “[३]

▶️ शैक्षणिक कार्य :-
महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.

महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती (मेजर कॅंडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत). त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं त्याच बरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केलीत. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण -सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली. जोतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधने नि उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थांना नि:शुल्क शिक्षण द्यावे, अशी त्यांनी प्रार्थना केली होती. त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला.[४]

▶️ सामाजिक कार्य:
मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.

‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ‘ सार्वजनिक सत्यधर्म ‘ संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!