आम्ही कलावंत विनोदातून समाजाच्या चेहर्यावर हास्य फुलवतो!-अभिनेते समीर चौघुले

चोपडा(प्रतिनिधी)आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनेत घडत असलेला विनोद बघण्यासाठी तिसरा डोळा असावा लागतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात विनोद दडलेला असतो कारण विनोद हा आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. विनोदाचे विषय हे आपल्या दैनंदिन जीवनातच असतात. आम्ही विनोदी कलावंत हेच हेरत असतो आणि तेच आमच्या सादरीकरणातून मांडत असतो. आपल्याकडे होणारे लग्न सोहळे हे विनोदासाठी खूप मोठा स्त्रोत आहेत.
नशीब फळफळणं, प्रेम मिळणं, नवीन नाती जुळणं हे काय असतं हे हास्यजत्रेमुळे शिकायला मिळाले. सोनी टीव्हीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे मी आणि आमची टीम सेलिब्रिटी नाही पण प्रत्येकाच्या घरा-घरातला भाग मात्र बनलो याचा जास्त आनंद आहे. या कार्यक्रमामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या भागातले अनेक चाहते मिळाले. भारतरत्न स्व. लता मंगेशकर, महानायक अमिताभ बच्चन, डॉ. विकास आमटे यासारख्या अनेकांनी मनापासून कौतुक केले.
विनोद निर्मिती सोपी नसते. अनेकांना हसवत असताना कोणाच्याही भावना दुखावू नये याची काळजी घ्यावी लागते. चार्ली चॅप्लिन, पु. ल. देशपांडे, रोवन ॲटकिन्सन (मिस्टर बिन) हे आपले आदर्श असून निखळ मनोरंजन आणि प्रेक्षकांच्या जीवनाशी नाते जोडणारे विनोद आणि प्रहसने सादर करण्याकडे, लेखनाकडे आपला कल असतो.
सामाजिक कार्य करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.
चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशन करत असलेले कार्य निश्चितच अभिनंदनीय आणि कौतुकास्पद आहे. समाजातील गुणवंत हेरून त्यांचा सत्कार करणे, कोरोना काळात मोफत अन्न, सध्या सुरू असलेला अन्नसेवेचा उपक्रम अशा उपक्रमांमुळे समाजात एकोपा निर्माण होत असतो. आम्ही कलावंत विनोदातून समाजाच्या चेहर्यावर हास्य फुलवतो तर प्रेरणा दर्पणसारख्या संस्था त्यांच्या कार्यातून हास्य फुलवीत आहेत.असे विचार सुप्रसिद्ध मराठी हास्य अभिनेते समीर चौघुले यांनी चोपडा येथे व्यक्त केले. येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशनतर्फे आनंदराज लॉन्सवर ७ एप्रिल रोजी आयोजित ‘दर्पण पुरस्कार – २०२२’ वितरण सोहळ्यात बोलत होते. या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी हे होते. याप्रसंगी माजी आमदार कैलास पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, प्रेरणा दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष शामकांत जाधव, उपाध्यक्ष डॉ. निर्मल टाटीया हे मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. निर्मल टाटीया व पुरस्कारार्थी पंकज बोरोले यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रा.अरुणभाई गुजराथी यांनी प्रारंभी समीर चौगुले यांचे चोपडावासियांतर्फे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले, जो कधी हसला नाही त्याला जीवन कळले नाही. हास्यामध्ये धैर्य, शौर्य आणि औदार्यही असते. हास्य जगण्याचा खुराक आहे. प्रेरणा दर्पण फाऊंडेशनचा हा सोहळा हा एकमेवाद्वितीय आहे. विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यासाठी प्रेरणा दर्पण फाउंडेशन मुळेच नामवंत व्यक्तिमत्त्व आपल्या चोपडा शहरात येतात.

▶️ दर्पण पुरस्कार -२०२२ चे मानकरी
स्वराली पंकज पाटील, डॉ प्रवीण दत्तात्रय चौधरी, पंकज सुरेश बोरोले, ॲड. संजय सरदारसिंग पावरा, वैभव दत्तात्रय शिंदे, उमेश शामराव बोरसे, सुभाष मदनलाल अग्रवाल, प्रकाश फुलचंद चौधरी, दत्तात्रय दयाराम पाटील, डॉ. पवन डोंगर पाटील, सौ. आशा नामदेव सोनवणे, भूषण कांतीलाल बाविस्कर, सय्यद अमजदअली, योगेश मधुकर सोनवणे, विष्णू अर्जुन दळवी, सौ. संध्या नरेश महाजन, शिवाजी अण्णा पाटील, नेहमीचंच सुकलाल जैन, दिनेश चंपालाल पाटील, नरेंद्र रायसिंग भादले, किरण शालीग्राम पाटील, सौ. अरुणा रामदास कोळी, सचिन फुलचंद चौधरी, मोहन बाबुलाल बागमार, नितीन प्रभाकर सपके तर दर्पण जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी रमेशकुमार बिरदीचंद मुणोत यांना समीर चौघुले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत दर्पण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. शाल, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. न. प. मुख्याधिकारी अविनाश गांगोडे व पालीवाल टेन्ट हाऊसचे प्रदीप पालीवाल यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या भव्य कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संजय बारी व योगिता पाटील यांनी केले तर प्रास्ताविक शामकांत जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मनोज चित्रकथी, विवेक बाविस्कर, विजय पालीवाल, निलेश कुंभार यांच्या चमूने ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सचिव लतिष जैन, हितेंद्र साळी, विश्वास वाडे, चेतन टाटीया, आकाश जैन, निलेश जाधव, अतुल पाटील, ॲड. अशोक जैन, लता जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी प्रदीप जैन (मिलाप स्टोअर्स), हर्षल मकवाना (मकवाना इंजिनीअर्स) डॉ. दीपक पाटील, डॉ. दिलीप पाटील (श्री नृसिंह हॉस्पिटल), प्रदीप पालीवाल, राजेंद्र माळी, स्वप्नील महाजन यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी तालुका व जिल्हाभरातून रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.