माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक;आज होणार न्यायालयात हजर!

मुंबई (वृत्तसंस्था)माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मध्यरात्री सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. बऱ्याच चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. देशमुख यांना आज मंगळवारी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यावरून केंद्रीय तपास यंत्रणांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. या कारवाईने महाविकास आघाडी सरकारच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत.
आजपर्यंत ‘ईडी’ने 4 वेळा देशमुख यांना समन्स पाठवले होते. मात्र त्यांनी वकिलांच्या मार्फत उत्तर देत कारवाईचा तपशिल मागितला होता. ‘ईडी’च्या संभाव्य कारवाईच्या विरोधात न्यायालयीन लढाईत अपयश आल्यानंतर देशमुख सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते. यानंतर संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्लीवरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी देखील अनिल देशमुख यांची 4 तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडीने अटक केली. याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली.
▶️ 13 तास कसून चौकशी
अनिल देशमुख यांची तब्बल 13 तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. अखेर आज पहाटे रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. देशमुख रात्रभर ईडी कार्यालयात असतील. मंगळवारी सकाळी त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले जाईल. यानंतर सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
▶️ आज न्यायालयात हजर होणार
अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर रात्री 3 वाजेपर्यंत अनिल देशमुख हे त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्याशी चर्चा करत होते. रात्री 3 वाजताच्या दरम्यान वकील इंद्रपाल हे देखील ईडी कार्यालयामधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी आपण या अटकेला न्यायालयात विरोध करणार आहोत, अशी माहिती दिली. आज सकाळी 10 वाजता देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल, तिथून ठीक 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.