राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूकीची प्रक्रिया सुरू!

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असल्याचे कळविले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत थांबवण्यात आल्या होत्या. शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेवरील स्थगिती ३१ ऑगस्ट २०२१ च्या पुढे वाढवली नसल्यामुळे प्राधिकरणाने २० सप्टेंबरपासून प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश १३ सप्टेंबर रोजी जारी केले आहेत. असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण विभागाचे सचिव यशवंत गिरी यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
१ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत निवडणुकीस पात्र सहकारी संस्थांच्या निवडणुकीकरिता स्वतंत्र आदेश पारित करण्यात येतील, असे प्राधणिकरणाकडून कळवण्यात आले आहे.
जिल्हा निवडणूक आराखड्यातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया (२५० व त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून आणि निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका वगळून) सुधारित कार्यक्रम सुरू करण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जारी केलेले आदेश असेः
१. जिल्हा निवडणूक आराखडयातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया दिनांक २०.०९.२०२१ पासून सुधारित निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे सुरू करावी. प्रथम टप्प्यातील संस्थांशिवाय इतर टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया परस्पर सुरू करू नये. तसेच निवडणूक प्रक्रिया सुरु न करण्याबाबत न्यायालयाचे विशिष्ट संस्थेबाबत आदेश असल्यास अशा
संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात येऊ नये.
२. जिल्हा निवडणूक आराखडयातील प्रथम टप्प्यातील ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीकरीता नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशा संस्था वगळून इतर सर्व सहकारी संस्थांच्या प्रारुप व अंतिम मतदार यादया दिनांक ३१.०८.२०२१ या अर्हता दिनांकावर पुन्हा नव्याने तयार कराव्यात.
३. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र स्वीकरणे सुरू झालेले आहे, अशा ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित टण्यापासून पुढे सुरू करण्याबाबतचा सुधारित निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाच्या मान्यतेस्तव सादर करावा. तसेच ‘क’ वर्गातील सहकारी संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमास संबंधित तालुका/प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांनी मान्यता दयावी.
४. नियतकालिक बदली, सेवानिवृती किंवा मृत्यू इत्यादी कारणास्तव यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवडणूक घेणे शक्य नसल्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्ती बदलाचा आदेश पारित करण्याबाबतचा प्रस्ताव शिफारशीसह प्राधिकरणाकडे तातडीने सादर करावा.
५. मतदार यादी व निवडणूक कार्यक्रमास जास्त खपाच्या एकाच स्थानिक वर्तमान पत्रात शासन मान्य दराने व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी. कोव्हिड-१९ या जागतिक महामारीचा विचार करून निवडणुकीस पात्र सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग इत्यादी उपाययोजनांचा अवलंब करावा. तसेच कोव्हिड-१९ बाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
७. जिल्हा निवडणूक आराखडयातील दोन ते सहा टप्प्यातील निवडणुकीस पात्र सहकारी संस्थांच्या प्रारुप मतदार यादया तयार करण्यासाठी प्राधिकरणाकडूनच टप्प्या- टप्प्याने अर्हता दिनांक स्वतंत्र आदेशाने घोषित करण्यात येईल.
८. निवडणुकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता आवश्यकता असल्यास शासनाच्या इतर विभागातील समकक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले.