आमदारांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट;पैश्यांची मागणी

▶️ आमदार अनिल पाटील यांच्या सोशल मीडिया टीम ने तात्काळ घेतली दखल
अमळनेर(प्रतिनिधी)विज्ञान शाप की वरदान अस आपण नेहमीच म्हणतो हल्ली सोशल मीडियाद्वारे सर्वसामान्य नागरिकांना फसवल्याच्या घटना नियमित आपल्या कानावर पडत असतात.पण आमदारांना ही कुणी फसवू शकत हे मात्र थोडं वेगळं, असच काहीसं प्रकरण अमळनेर विधानसभेचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या बाबतीत झालं आहे.
आमदारांचे सोशल मीडियावर भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील या नावाने फेसबुक अकाउंट आहे.बनावट अकाउंट बनवणाऱ्याने याच नावाशी साधर्म्य व सारखेच वाटणारे “भूमिपुऋ आमदार अनिल भाईदास पाटील” या नावाने सोशल मीडियावर अकाउंट तयार केले.
या अकाउंट च्या माध्यमातून तालुक्यातील भरवस, शिरूड व शिरसाळे इतर गावातील कार्यकर्त्यांना पैस्यांची मागणी करणारे संदेश पाठवले गेले.कार्यकर्ते सजग असल्याने त्यांनी तात्काळ ही गोष्ट आमदारांच्या कानावर घातली,एकामागून एक फोन आमदारांना येऊ लागल्याने आमदारांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सोशल मीडिया हाताळणारे केशवा आय.टी.व्हिजन चे संचालक गणेश भामरे यांच्याशी तात्काळ संपर्क साधून प्रकरणावर लक्ष ठेवायला सांगितले.सोशल मीडियाच्या टीमने फेसबुक शी संपर्क साधून व तांत्रिक बाबींची पूर्तता करून काही तासांच्या आत बनावट अकाउंट बंद केले. तोवर आमदारांचे स्विय सहाय्यक सचिन बेहरे यांनी ही बाब पोलीस निरीक्षक यांच्या कानावर टाकून ठेवली जेणेकरून काही झाल्यास त्यावर सायबर सेलच्या माध्यमातून तात्काळ कारवाई होऊ शकेल. सदर बनावट फेसबुक अकाउंट बंद झाल्यानंतर आमदारांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला.

▶️ मला या गोष्टीची माहिती मिळाल्यावर लगेच माझ्या सोशल मिडिया टीमशी संपर्क साधुन तात्काळ तांत्रिक बाबी तपासुन सदर बनावट अकाउंट बंद करण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या. भविष्यात अश्या घटना सामान्य नागरिकांच्या बाबतीत सुद्दा घडू शकतात व त्या द्वारे पैशाची मागणी होऊ शकते म्ह्णून अश्या वेळी नागरिकांनी हॅकर्सच्या मागणीला बळी न पडता व घाबरून न जाता पोलीस दलाशी संपर्क साधावा.
अनिल भाईदास पाटील.
आमदार अमळनेर विधानसभा मतदारसंघ