स्वर्गीय बापूसाहेब पी.आर.काटे (सर) यांना 71 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

‘ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया असतो;त्याच्या आयुष्याची इमारत मजबूत असते’. याच मूर्तिमंत उदाहरण होते बापूसाहेब स्वर्गीय पी.आर.काटे (सर) .. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.हे बिरुद बापूंच्या आयुष्याचा जणू भागच बनलेला होता.बापू म्हणजे एक आदर्श शिक्षक, उत्कृष्ट मुख्याध्यापक, कुशल कुटुंब प्रमुख,कर्तव्य पारायण नागरिक, आदर्श पिता, पती,बंधू आणि आजोबा. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ह्या जबाबदाऱ्या लीलया पार पडतांना त्यांना कधी थकलेले पाहिले नाही.शरीर सुदृढ ठेवण्यासाठी ते नियमित प्राणायाम व पायी चालायचे आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी वाचन,प्रार्थना व नातवंडांचा अभ्यास घ्यायचे.असा आदर्शवत दिनक्रम त्यांचा असे.. अशा सानेगुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर नगरीत वास्तव्यास असणाऱ्या व सानेगुरुजी च्या ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’। या प्रार्थने प्रमाणे जगणाऱ्या बापूसाहेब स्वर्गीय पी.आर. काटे (सर) यांच्या 71 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटावर दिलेला हा उजाळा…!
बापूंचे पूर्ण नाव प्रतापराव राजाराम काटे. त्यांचा जन्म 13 जून 1950 रोजी झाला. बापूंचे वडील राजाराम सखाराम काटे हे जिल्हापरिषद शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक होते.घरात शिक्षणाचा वारसा असल्याने पुढे जाऊन बापूही शिक्षकच झाले. बापूंना कै.पुरुषोत्तम काटे, कै.प्रभाकर काटे, प्रा एम आर काटे हे तीन भाऊ कै सुमनबाई सोनवणे(चहार्डी,) कुसुमबाई सोनवणे (मुडी ) सुशिलाबाई पाटील (किनगाव) या तीन बहिणी असे सप्त भावंडांचं मोठं कुटुंब असूनही गुण्यागोविंदाने सातही भावंडे राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कांतीलाल काटे, विनोद काटे, संजय काटे, जितेंद्र काटे, चंद्रकांत काटे, प्रशांत काटे, डॉ सचिन काटे हे सप्त पुतणे, सुनंदा बोरसे (अनवर्दे), निर्मला सोनवणे (मुडी ) या दोन पुतणी एकत्र कुटुंबात संस्कारित वाढले व मोठे झाले.

बापूंचे बालपण पारोळा (जि. जळगाव) तालुक्यातील कोळपिंप्री येथे गेले. त्यांचं प्राथमिक शिक्षण ही कोळप्रिंप्री गावातच झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण चोपडा तालुक्यातील चहार्डी या गावी आपल्या मोठया भगिनीकडे झाले. पुढे त्यांनी अकरावी नंतर डी.एड.पदवी मिळवली. तत्कालीन काळात डी. एड.च्या शिक्षणाला फार महत्त्व असे. त्यामुळे ते लवकरच 1972 मध्ये शिक्षण महर्षी विनायकराव दादा सोनवणे यांच्या आशीर्वादाने मुडी प्र डांगरी ता.अमळनेर येथील हायस्कुलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. वर्षभर तेथे काम केल्यानंतर ते कोळपिंप्री या आपल्या मूळ गावच्या बी.एस.हायस्कूल येथे त्यांची बदली झाली. तेथे मात्र ते स्थिरस्थावर झाले. त्यानंतर ते थेट निवृत्त होई पर्यंत म्हणजे 35 वर्ष सेवा त्यांनी तेथे दिली. मधल्या काळात त्यांची शिरूड हायस्कूलला एका वर्षासाठी बदली झाली होती. अशी एकूण आयुष्याची 37 वर्ष शिक्षक म्हणून बापूंनी अध्यापनाचे कार्य केले.अध्यापनाचे काम करत असताना त्यांनी अनेक सामाजिक कामे ही केली.आपल्या विद्यार्थ्यांना शिस्तीचे पाठ दिले.साधी राहणी उच्च विचारसरणी उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या सेवकाळात विद्यार्थ्यांसमोर वस्तूपाठ घालून दिला.दरम्यान बापूंचा विवाह सुविद्य विमलबाईंशी झाला. बापूंना एक मुलगी व दोन मुले जयेशकुमार व उमेश. थोरला मुलगा जयेशकुमार व सून गायत्री काटे हे दोघंही शिक्षक आहेत. लहान चिरंजीव उमेश देखील शिक्षक आहे. लहान सुनबाई निकिता काटे उच्चशिक्षित असून गृहिणी म्हणून कार्य करतात. जागृती, शाहूराजे, भूमी व साऊ अशी नातवंडे आहेत. विशेष म्हणजे मुलगी वैशुमाई, जावई यशोदीप सोनवणे, नातू प्रथमेश व वेदांत ह्यांना त्यांनी आपल्या सानिध्यातच ठेवले. एकत्र कुटुंब कसे असावे याचे जिवंत उदाहरण म्हणजे काटे कुटुंब. या कुटुंबरुपी रोपट्याचे संगोपन बापूसाहेबांनी उत्कृष्टपणे केल्यामुळे त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. “एकीचे बळ मिळते फळ” या उक्तीनुसार हे कुटुंब ‘काटे पॅलेस’ व ‘प्रतापिय’ या निवासस्थानी बापूसाहेबांच्या गोड आठवणीत गुण्यागोविंदाने राहत आहेत.

शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल बापूसाहेबांना 1989-90 यावर्षी तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार तर 1997-98 ला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केवळ पुरस्कारापुरते काम न करता बापूंनी सतत आपल्या कारकिर्दीत अनेक आदर्श विद्यार्थी घडवून त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचं काम देखील केलं. त्यामुळे त्यांचे कोळपिंप्री, भिलाली, कन्हेरे, बिलखेडे, मुडी, शिरूड येथील शेकडो विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रात पंचक्रोशीत त्यांनी नावलौकिक मिळवला. पुढे जाऊन त्यांनी ज्या संस्थेत शिक्षक म्हणून काम केले त्याच ग्राम विकास शिक्षण संस्थेचे संचालक अर्थात शिक्षक प्रतिनिधी म्हणून बापूंनी काम पाहिले. त्यानी त्यावेळी शिक्षकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले.
शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी सहकार व सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यात प्रामुख्याने फ्रुटसेल सोसायटी (अमळनेर) चे सातत्याने तज्ञसंचालक म्हणून त्यांनी कार्य केले व मृत्यपर्यंत ते विद्यमान संचालक पदावर कार्यरत होते. कोळप्रिंप्री गावात लोकांना वाचनाचा छंद जोपासता यावा या उदात्त हेतूने त्यांनी कै. रा.स.पाटील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाची स्थापना केली. वाचनालयाचे ते विद्यमान अध्यक्ष होते. बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही चिरंजीव शिवशाही फाउंडेशन (अमळनेर), साप्ताहिक प्रजाराज्य न्यूज, न्यूज पोर्टल-प्रजाराज्य न्यूज च्या माध्यमातून कार्य करीत आहेत.
बापूसाहेबांच्या हा कार्याचा वसा त्यांचे दोघेही मुलं अतिशय नावलौकिकाने चालवीत आहेत. शिक्षकाची तिसरी पिढी निर्माण करण्याचे पवित्र कार्य त्यांनी केले. थोरले चिरंजीव जयेशकुमार काटे यांना आमदार आबासो चिमणराव पाटील यांच्या सहकार्याने पारोळा येथील उत्कर्ष विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू केले. जयेशकुमार हे प्रजाराज्य न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक असून शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. लहान चिरंजीव उमेश काटे यांना माजी केंद्रीय मंत्री नानासो विजय नवल पाटील यांच्या सहकार्याने अमळनेर येथील आर्मी स्कूल येथे शिक्षक म्हणून रुजू केले. ते सकाळ वृत्तपत्राचे अमळनेर तालुका बातमीदार आहेत. दोन्ही मुलांना आदर्श पत्रकारितेचे धडे बापूसाहेबांनी दिले.
शेवटच्या श्वासापर्यंत बापूसाहेबांचा दिनक्रम तरुणांही लाजवेल असाच होता. प्रातःकाळी लवकर उठून शतपावली साठी ढेकू रोडला फिरून येणे,नातवंडांना शिकवणी देणे, घरातील इथंभूत जबाबदाऱ्या सांभाळणे,मित्र-नातेवाईक इ. नां योग्य मानमरातब देणे.आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे घरात पत्नी, दोन शिक्षक मुलं व दोन सुना असून देखील वयाच्या सत्तरीतही त्यानी कुटुंब प्रमुख म्हणून घराचा सर्वोतोपरी कारभार यशस्वीरीत्या सांभाळला. “जोडोनिया धन उत्तम व्यवहारे” हा विचार ते आपल्या कृतीतून जगले. अशा शिक्षण पंढरीचे वारकरी, कर्तव्यपारायन मा.बापूसाहेब पी.आर. काटे यांनी दवाखान्यात 34 दिवस मृत्यूशी झुंज दिली. जो आवडे सर्वांना.. तोच आवडे देवाला या उक्तीनुसार अखेर अमळनेरला खासगी दवाखान्यात 30 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7.30 वा प्राणज्योत मालवली. दरम्यान बापूसाहेबाची आज जयंती या पार्श्वभूमीवर शिवशाही फाउंडेशन, प्रजाराज्य न्यूज,सकाळ वृत्त समूह, काटे परिवार, कोळपिंप्री ग्रामस्थ, ढेकु रोड परिवारातर्फे विनम्र अभिवादन..!
✍? शब्दांकन- प्रा. शरद भिका पाटील
तालुका प्रतिनिधी- प्रजाराज्य न्यूज
माध्यमिक शिक्षक- विजयनाना पाटील आर्मी स्कुल अमळनेर
