‘यास’ चक्रीवादळ आज पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकणार!

0

पुणे (वृत्तसंस्था) बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ाचे रुपांतर चक्रीवादळात झाले असून, ओमनकडून त्याचे ‘यास’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी अतितीव्र रूप धारण करण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीवादळ निर्माण होण्यापूर्वी २१ मे रोजी मोसमी वाऱ्यांचे अंदमानमध्ये आगमन झाले होते. त्यानंतर एकाच दिवसांत त्यांनी थेट श्रीलंकेपर्यंत मजल मारली. मात्र, कमी दाबाच्या पट्टय़ाचे चक्रीवादळात रूपांतर होण्याच्या काळात दोन दिवस मोसमी वाऱ्यांची प्रगती थांबली आहे. चक्रीवादळ हळूहळू तीव्र होत असून, २५ मे रोजी ते अतितीव्र रूप धारण करून उत्तर-पश्चिम दिशेने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दिशेने जाणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीला २६ मे रोजी चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. अतितीव्र स्वरूपात चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी १५५ ते १८५ किलोमीटर पर्यंत जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ओडिसा, पश्चिम बंगलसह आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
▶️ मध्य महाराष्ट्र, कोकणात पाऊस
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र,सध्या अरबी समुद्र आणि किनारपट्टीवर चक्रीय चक्रवात कायम आहे. याचा परिणाम म्हणून समुद्रातून काही प्रमाणात बाष्प येत असल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे.
▶️ ‘प्राणवायू वाहून नेण्यात खंड नको’
‘यास’ चक्रीवादळाच्या काळातही ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्प चालू राहतील याची दक्षता घ्यावी, असे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने म्हटले आहे. मदत पथकांनी त्यासाठी सहकार्य करावे असे सांगण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात यास नावाचे चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांना फटका बसणार असून त्याला तोंड देण्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक एस.एन प्रधान यांनी सांगितले, की मदत कार्यासाठी एकूण १४९ पथके तयार करण्यात आली आहेत. त्यातील ९९ प्रत्यक्षात जेथे वादळाचा प्रभाव जाणवणार आहे तेथे तैनात केली जाणार असून पन्नास मदत पथके अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना हेलिकॉप्टरच्या मदतीने उचलून घेण्यासाठी तयार ठेवण्यात आली आहेत. याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!