‘होम आयसोलेशन’ पूर्ण बंद;’लॉकडाऊन’ बाबत गुरुवारी निर्णय होणार!

मुंबई (वृत्तसंस्था) होम आयसोलेशनमधील अनेक कोरोनाबाधित रुग्ण मोकाट फिरत आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णाला ‘होम आयसोलेशन’मध्ये न ठेवता, त्याच्यावर ‘कोविड केअर सेंटर’मध्येच उपचार होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना टोपे यांनी राज्यात ‘होम आयसोलेशन’ पूर्णपणे बंद करून कोविड सेंटरची संख्या वाढवणार असल्याचे सांगितले
▶️ टोपे यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे
▪️लसीकरणासाठी राज्य सरकारने ‘ग्लोबल टेंडर’ काढले होते; पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच लसी आयात करून राज्यांना त्याचे वाटप करावे. लसीचे पैसे द्यायला राज्य तयार आहे.
▪️ म्युकर मायकोसिस आजारावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार सुरु आहेत. खासगी रुग्णालयातही या आजारावर मोफत उपचार व्हावेत किंवा शासनाने ठरवलेल्या दरानुसार उपचार व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
▪️मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. या पैशातून म्युकर मायकोसिस आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
▪️राज्यातील लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (ता.27) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत.
▪️कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ‘आशा’ सेविकांना ‘अँटीजेन टेस्ट’चे प्रशिक्षण देणार आहोत.