माॅन्सून अंदमानात दाखल; महाराष्ट्रात वेळेआधीच येणार पाऊस!

मुंबई (वृत्तसंस्था) तौक्ते वादळामुळे गोवा, महाराष्ट्र, गुजरातसह पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, या वादळाने माॅन्सूनचे ढगही भारतापर्यंत खेचून आणले.
हवामान विभागाने 21 मे रोजी माॅन्सून (Monsoon) अंदमानात धडकणार असल्याचं अंदाज वर्तवला होता. त्यानुसार बरोबर वेळेत माॅन्सून अंदमानात दाखल झाला.
साधारणपणे अंदमानवरून केरळपर्यंत मोसमी पावसाचा प्रवास १२ दिवसांपर्यंतचा असतो. मात्र, तौक्ते वादळामुळे सातव्या दिवशीच तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. 1 जून रोजी केरळमध्ये माॅन्सून धडक देणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते वादळाचा प्रभाव गुरुवारी (ता. 20) पूर्ण ओसरला. राजस्थानातही पाऊस उघडला आहे. नैऋत्य मोसमी वारे आज अंदमान बेटांवर पोहोचले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे निकोबार बेट, बंगालचा उपसागर, संपूर्ण अंदमान आणि उत्तर अंदमानाच्या काही भागात माॅन्सूनचा परिणाम दिसत आहे. पुढील 48 तास हा परिणाम कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या माॅन्सूनसाठी पोषक वातावरण आहे. परिणामी, 1 जून रोजी माॅन्सून केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर 10 जूनपर्यंत तो तळकोकणात येऊ शकतो. त्यानंतर 15 ते 20 जूनदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात माॅन्सूनच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.