सोनूवर कशाला भरोसा करायचा? सोनुने केले लग्न तेरा;सगळ्यांचे वाजले बारा!

अमळनेर (प्रतिनिधी) सोनू शिंदे नावाच्या तरुणीने तब्बल 13 तरुणांना फसवलं असून त्यांच्याशी लग्नाचं नाटक केलं आणि त्यांना लुटून पळून गेली आहे.विनोदाचा भाग असा की,सोनू ,तुझा माझ्यावर भरोसा नाय का? हे गाणं आपण सगळ्यांनी ऐकलंय पण इथे सोनू वरच भरोसा नाही राहिला तेव्हा असे म्हणावेसे वाटते,सोनूवर कशाला भरोसा करायचा? सोनुने केले लग्न तेरा;सगळ्यांचे वाजले बारा!
खान्देशात या करामती सोनू शिंदे नावाच्या तरुणीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.या सोनूने तब्बल 13 मुलांना फसवलं.तिने आजवर तेरा जणांशी लग्न केलं होतं,त्यानंतर त्यांची फसवणूक करत लुटून पळ काढला.विशेष म्हणजे ती एकटी नाही तर तिला साथ देण्यासाठी तिची एक मोठी टोळीच आहे.
सविस्तर वृत्त असे की,हिंगोली आणि अकोला येथील ‘सोनू शिंदे’ ही टोळी असल्याची माहिती पोलिसांनी तपास केला असता समोर आली आहे . अनेक तरुणांसोबत लग्न जुळवण्यासाठी ही टोळी विविध शहरांमधील दलालांची मदत घ्यायची आणि लग्न करण्याचा तरुण गळाला लावायची.यावेळी तिने नंदुरबारात एका कुटुंबाला फसवलं तेव्हा तिला या कामात औरंगाबादच्या एका दलालाने मदत केल्याचं समजतंय . हा सगळा प्रकार आता उघड झाला आहे.सोनू शिंदे या तरुणीने दोन आठवड्यांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या मंदाणे येथील एका तरुणाशी लग्न केलं.या कामात औरंगाबादमधील दलालाने मदत केली.या लग्नासाठी वधू पक्षाकडून लाखांमध्ये मागणी झाली होती. तरुणांच्या कुटुंबियांनी वधू पक्षाला पैसेही दिले,पण नंतर व्हायचं ते झालंच,लग्नानंतर नवी नवरी नांदलीच नाही,ती पळून गेली.
घरात नवी नवरी आल्याने वातावरण खुश होतं.अचानक पळून गेल्यानंतर संबंधित कुटुंबाला मोठा झटका बसला.या कुटुंबाला आपण लुबाडलो गेलो याची जाणीव झाली.त्यांनी तातडीने शहादा पोलिसात तक्रार केली.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली.अखेर पोलिसांना सोनू शिंदे नावाची तरुणी सिंदखेडा तालुक्यातील पढावद एका तरुणाशी 13 वं लग्न करणार असल्याची बातमी मिळाली.पोलीस आपला तपास करत असल्याचा सुगावा या टोळीला लागला.त्यांनी थेट विवाहस्थळ बदललं.मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला टीमने नरडाणा पोलिसांच्या मदतीने वेळेवर म्हणजे लग्न लागणार होतंच त्याआधीच लग्न मंडपातून सोनू शिंदे टोळीला जेरबंद केलं.पोलिसांनी वेळेवर जाऊन लग्न मंडपातून सोनू शिंदे टोळीला अटक केली.पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच नवरीची आई आणि भाऊ आणि दलाल पळून जाण्यात यशस्वी ठरले.पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.पण वधू सोनू आणि सोनूचा मामा योगेश साठे, सोनूची मावशी पूजा साळवे हे पकडले गेले.

