पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला तौत्के वादळ परिस्थितीचा आढावा; नागरिकांना बाहेर न निघण्याचे आवाहन!

मुंबई (वृत्तसंस्था) तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात बसल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. अशावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. तिथून त्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत. वादळाची तीव्रता संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
वादळची दिशा गुजरातकडे आहे, वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, सखल भागात पाणी साचले आहे, जम्बो सेंटर्सच्या मेंटेन्सनची कामे सुरु आहेत, रात्रीपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील, विनाकारण घराबाहेर पडू नका, हे वादळ आहे, मुंबईत कधीही न झालेले वारे आपण पाहात आहोत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसंच १६० mm , १२० mm पाऊस वादळ आणि वाऱ्यासह होतोय. मनुष्यहानी होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हायटाईड आहे, ती निघून जाईल. पण त्यानंतरही खबरदारी घ्यावी लागेल. कधीही न पाहिलेले चक्रीवादळ मुंबई आता पाहत असल्याचंही आदित्य ठाकरे म्हटले.
त्याचबरोबर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्यात चर्चा होते, आवश्यक सूचना दिल्या जातात,एकमेकांशी समन्वय साधून, सर्वजण मिळून काम करत आहोत.