प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरीत!

0

पुणे(वृत्तसंस्था) प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना (PMKISAN) अंतर्गत देशातील 9.50 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यातील (एप्रिल, 21 ते जुलै, 21) रूपये 19 हजार कोटीहून अधिक रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरणाचा कार्यक्रम दिल्ली येथून 14 मे, 2021 रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाइन पार पडला आहे.
हस्तांतरित केलेली रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. माहे फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून देशातील 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत रूपये 1.15 लाख कोटीहून अधिक रकमेचा लाभ देण्यात आला आहे. असे धीरजकुमार, आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्यात या योजने अंतर्गत सुरुवातीपासून दिनांक 13 मे, 2021 अखेर 105.30 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण रु. 11 हजार 694 कोटी रकमेचा लाभ हस्तांतरित झाला आहे. तसेच 14 मे, 2021 रोजीच्या कार्यक्रमात दिनांक 1 एप्रील, 2021 ते दिनांक 31 जुलै, 2021 या कालावधीकरिता देय आठव्या हप्त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकुण 95.91 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारण रूपये 1 हजार 918 कोटीचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला गेला.
चालू वर्षी भारतीय हवामान विभागाने सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचे अनुमान जाहीर केले आहे. पाऊस वेळेवर सुरू होऊन जूनमध्ये पेरणीच्या दृष्टीने हा लाभ खरीप 2021 हंगामात विविध कृषी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असून यामुळे कृषी उत्पादन वाढीला चालना मिळणार असल्याचे धीरजकुमार, आयुक्त, कृषि तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख पीएम किसान, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!