कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज ! त्रिसूत्रीचे पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

0

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आजच्या स्थितीत कोरोना बाधीत ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या साडेअकरा हजार आहे. गेल्या काही दिवसांत बाधित रूग्ण व बरे होणा-या रूग्णांची संख्या समान पातळीवर आहेत. ही दिलासादायक बाब असली तरी जिल्हा प्रशासन अधिक सतर्कता बाळगून कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहेत. नागरीकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीचे पालन करून कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हावासियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना आज केले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ.बी.टी.जमादार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी ऑक्सीजन बेडची कमतरता जाणवत होती. तीही आता नाही. ऑक्सीजन बेड पुरेसे असून व्हेटीलेटरही आहेत. बेड मॅनेजमेंट सिस्टीममुळे रूग्णांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाची मागील वर्षाची व आताची परिस्थिती लक्षात घेता आगामी आठ ते दहा दिवसात रूग्ण संख्या हळूहळू कमी होवू शकेल. मंगळवार (14 एप्रिल) पासून मोहाडी रोडवरील महिला रुग्णालयात पाचशे बेडचे हॉस्पीटल सुरू करीत आहोत. पहिल्या टप्प्यात शंभर बेडचे नियोजन झाले असून ऑक्सीजन बेडसह कोविड केअर सेंटरही सुरू करीत आहोत. त्यामुळे आता बेडची अडचण राहणार नाही.
ऑक्सीजनचा वापर काटकसरीने हवा
जिल्ह्यातील बाधीत रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन लागतो. रोजची मागणी ४०-४५ टनची असते. आपली कॅपीसिटी ५० टन ऑक्सीजन साठविण्याची आहे. आपल्याकडे पुरेसा साठा उपलब्ध असतो. भविष्यात अडचण येऊ नये याकरीता आपण जिल्ह्यात तयार होणारा ऑक्सीजन केवळ वैद्यकीय कामांसाठी राखून ठेवण्याचे सांगितले आहे. सोबतच रुग्णांना विनाकारण ऑक्सीजन लावला जातो. तो कमी करण्यास सांगीतले आहे. गरज असेल तरच ऑक्सीजन लावा. ज्यांचे सॅच्यूरेशन ९४ पर्यंत आहे अशांनाही ऑक्सीजन सुरूच असतो. हे चूकीचे आहे. यामुळे गरज असलेल्यांना ऑक्सीजन देण्याचे आदेश आरेाग्य यंत्रणेसह खासगी डॉक्टरांना दिले आहे. भविष्यात ऑक्सीजनची टंचाई जाणवू नये यासाठी आतापासूनच काळजी घेत ऑक्सीजन वापरण्याच्या सूचना खाजगी हाॅस्पिटलसह बिगर वैद्यकीय आस्थापनांना दिल्या आहेत.
‘रेमडेसिवीर ’ गरजूंनाच द्यावे
सध्या रेमडेसिवीरचे उत्पादन घटल्याने त्याची टंचाई भासत आहे. रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. खासगी डॉक्टरांनी रूग्णाची आवश्यकता लक्षात घेऊनच ‘रेमडेसिवीर ’ द्यावे. याबाबत ‘आयसीएमआर’ व टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात घ्याव्यात. गरज नसताना रूग्णास रेमडेसिवीर दिल्यास त्याचे दूष्परिणाम रुग्णाला होवू शकतात. यामुळे सर्व खासगी डॉक्टरांनी रेमडेसिवीरचा वापर गरजू रुग्णांसाठीच करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. आता रेमडेसिवीर रुग्णांच्या नातेवाईकांना लिहून न देता डॉक्टरांनीच त्यांच्या मेडीकलमधून द्यावे. त्याचे बिल रूग्णाला डिस्चार्ज देताना द्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहे. यामुळे रुग्णाला रेमडेसिवीरसाठी भटकंती करावी लागणार नाही. रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडेसिवीर नियंत्रण कक्षात फोन करून आपली मागणी नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहेत.
133 लसीकरण केंद्रावर लसीकरण
जिल्ह्यात आज चाळीस हजार कोरोना लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. त्या आज दिवसभरात जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर पोचतील. उद्यापासून केंद्रावर लसीकरण सूरू होईल. आगामी तीन ते चार दिवस पुरेल एवढा हा साठा आहे. पुढील काळासाठी मागणी नोंदविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. जिल्हावासियांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. व गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!