साहित्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीसमोर येणे महत्त्वाचे!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई (वृत्तसंस्था) डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्तम कायदेपंडित होते. त्यांच्या विचाराने सर्वसामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन होण्यास मोठी मदत झाली. त्यांचे विचार समजून घेत असताना ते साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढी समोर येणे तेवढेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने संपादित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोअर्स मटेरियल खंड क्र. 3-1 जनता या खंडाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

या प्रकाशन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष उदय सामंत, ऊर्जामंत्री तथा समितीचे सदस्य डॉ.नितीन राऊत, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा समितीचे उपाध्यक्ष प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ.कृष्णा कांबळे, डॉ.भालचंद्र मुणगेकर आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, हा ग्रंथ म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं सोनं आहे. यामध्ये सर्व विषयांचा समावेश असून कुठलंही पान उघडले तर त्यांचे विचार यातून दिसतात. या विचाराचे प्रकाशन आज करत आहोत हे भाग्य आहे. यातूनच त्यांची विद्वत्ता दिसून येते. ती पुस्तकीय नव्हती तर अनुभवाची होती. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धाडस, शौर्य बाबासाहेबांमध्ये होते. त्यांचे विचार आपण टप्प्याटप्प्याने खंड रुपात समजून घेत आहोत परंतु अखंड डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजून घेतलं पाहिजे.

महाविकास आघाडी सरकार हे या विचाराचे सरकार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य प्रकाशनासाठी निधीची कमतरता भासणार नाही. साहित्य प्रकाशनासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

श्री.राऊत म्हणाले, 1920 च्या दशकापर्यंत बहिष्कृत समाजाची ठामपणे बाजू घेईल असे एकही वृत्तपत्र नव्हते. मराठी वृत्तपत्रांच्या साखळीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत व जनता पत्र मुंबईतून प्रकाशित करत बहिष्कृतांचा आवाज बुलंद केला. दि.24 नोव्हेंबर 1930 ला बाबासाहेबांनी जनता पाक्षिक प्रसिद्ध करण्यास सुरूवात केली. जवळपास 25 ते 26 वर्षे आंबेडकरी चळवळीचे आंबेडकर कालीन दीर्घकाळ प्रवास करणारे साप्ताहिक वृत्तपत्र म्हणून जनता चा उल्लेख केला जातो. या काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक स्थितीचे आंबेडकरी दृष्टीने केलेले विश्लेषण यात बघायला मिळते. तसेच भारतातील तत्कालीन वेगवेगळ्या विचारांच्या चळवळीचा आणि घटनांचा तपशील व संदर्भ यात पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने तो त्या काळातील घडामोडींचा दस्तऐवज म्हणजेच ऐतिहासिक ठेवा आहे.

‘जनता’ मधील हा संदर्भमूल्य असलेला ठेवा पिढ्यान् पिढ्यांना प्रेरणा देणारा हा धगधगता दस्तावेज पुस्तकरूपात प्रकाशित होत आहे याचा मला खूप आनंद वाटतोय. हे पुस्तक प्रत्येकाने वाचून बाबासाहेबांच्या विचारांपासून, संघर्षापासून प्रेरणा घ्यावी, असेही श्री.राऊत यांनी यावेळी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!