आई वडिलांनी केली कोरोनावर मात;सेवा करणाऱ्या मुलाचा कोरोनाने केला घात!

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या काळात आई वडिलांची सेवा करून बरा करणाऱ्या 36 वर्षीय तरुण कोरोनाने बाधित झाला आणि त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना काल घडली.
शहरातील तांबेपुरा भागातील रहिवासी सुखदेव भालेराव हे सेवानिवृत्त शिक्षक आणि त्यांच्या पत्नी पुष्पाबाई भालेराव यांना 17 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांची मुलगी रंजनाबाई ही डॉ. नितीन पाटील यांच्याकडे परिचारिका आहे.तिने आई वडिलांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांची काळजी घेतली. तिचा भाऊ प्रवीण भालेराव याला देखील आई वडिलांसाठी दोन्ही बहिणी धावपळ करत असल्याचे समजताच तो देखील आई वडिलांच्या सेवेला हजर झाला आणि हळूहळू त्याला देखील कोरोनाची लागण झाली.बहिणीने भावाचीही जबाबदारी स्वीकारली. पैसे नसल्याने त्यालाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आणि आई वडिलांना बरे करून भावाच्या सेवेसाठी रात्रदिवस रुग्णालयात हजर होती पण अखेर आई वडिलांच्या सेवेसाठी हजर झालेल्या तरुणाचा कोरोना ने बळी घेतला.म्हाताऱ्या आई वडिलांना बरे करून मुलगा मात्र सोडून गेला.या घटनेमुळे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.