आदर्श शिक्षक स.ध.भावसार तर्फे पोस्ट कर्मचाऱ्याचा सत्कार!

पारोळा (प्रतिनिधी) येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी पारोळा उपडाकघर कार्यालयातील गृप डी कर्मचारी शशीकांत नवल पाटील यांचा प्रामाणिक सेवेबद्दल आपल्या निवासस्थानी बोलावून शाल,श्रीफळ, पुष्पहार,रोख बक्षीस व अभिनंदन पत्र देऊन सत्कार केला.
शशीकांत पाटील हे पारोळा तालुक्यातील करमाड येथील रहिवासी असून ढोली ता. पारोळा येथे ग्रामीण डाकसेवक म्हणून काम केले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून पारोळा येथे गृप डी कर्मचारी म्हणून प्रामाणिकपणे, जबाबदारीने, निष्ठेने व उत्तम प्रकारे सेवा बजावत आहेत.
शहरात पाच ठिकाणी टपाल पेट्या आहेत.त्यात टपाल असो किंवा नसो दररोज नियमितपणे ते पाचही पेट्यांपर्यंत जातात व टपाल काढून कार्यालयात पोचवतात.यामुळेच प्रभावित होऊन भावसार सरांनी त्यांचा सत्कार केला.
पारोळा उप डाकपाल रमेश पवार सह कार्यालयातील सर्व कर्मचारी व पोस्टमन यांनी शशीकांत पाटील यांचे अभिनंदन करुन भावसार सरांचे आभार मानले.