दोन तरुण शिक्षक मित्रांचा 13 दिवसात कोरोनाने दुर्दैवी मृत्यू!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ताडेपुरा भागातील रहिवासी व बोळे तांडा (ता.पारोळा) येथील अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक विशाल संतोष संदानशिव उर्फ छोटु मास्टर (वय-38) यांचे काल दुपारी निधन झाले.आपल्या शाळेतील शिक्षक हेमकांत अशोक पाटील (वय- 38) या मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या 13 दिवसातच या शिक्षक मित्रानेही जगाचा निरोप घेतला. जणू काही मृत्यूनंतर त्यांनी “ही दोस्ती तुटायची नाय” असे म्हणत आपली मैत्री कायम असल्याचा संदेश देत, या करुण कहाणीचा कोरोनाने अंत केला.
विशाल संदानशिव व हेमकांत पाटील या दोघांची घरची परिस्थिती बेताचीच होती. पारोळा- एरंडोल तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी त्या दोघांना डीएड झाल्यानंतर 2005 मध्ये बोळे तांडा (ता.पारोळा) येथील अनुदानित आश्रमशाळेत नोकरीला लावले. हे दोघेही अमळनेर शहरातच वास्तव्याला होते. विशाल संदानशिव हे ताडेपुरा भागात तर हेमकांत पाटील हे अंतुर्ली (ता.भडगाव) येथील मूळ रहिवाशी होते मात्र ते येथील एलआयसी कॉलनीत राहत होते. ते नेहमी सोबत शाळेत जायचे. सुखदुःखात एकमेकांना साथ देत धीर द्यायचे. नोकरीनंतर सर्व काही अलबेल सुरू होते. अन अचानक या दोघांच्या मैत्रीला कोणाची तरी नजर लागली अन दोघांना कोरोना ने ग्रासले. विशेष म्हणजे दोघांना अमळनेर येथे बेड उपलब्ध झाले नाही. त्या दोघांना धुळे येथील एकाच खासगी दवाखान्यात उपचारासाठी सोबतच दाखल करण्यात आले,त्यांचा बेड पण जवळ जवळ होता मात्र अवघ्या 4 दिवसानंतर हेमकांत पाटील यांच्यावर क्रूर काळाने झडप घातली अन 22 मार्चला त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ही बाब विशाल संदानशीव यांच्या पासून लपविण्यात आली. कोरोना महामारीच्या या नभात काळे ढग अजूनही गर्दीच करत होते, शेवटी जे घडायला नको होते, तेच घडले. आज दुपारी विशाल संदानशीव यांनी ही अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. सोबत असलेली ही मैत्री क्रूर काळाने मृत्यूनंतर ही कायम ठेवली. “जो आवडे सर्वाना … तोची आवडे देवाला” असेच या प्रसंगी म्हणता येईल. दरम्यान शिक्षक विशाल संदानशिव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 4 वर्षाचा मुलगा, 9 वर्षाची मुलगी व एक भाऊ असा परिवार आहे.
आ.चिमणराव पाटील यांच्या संस्थेकडून 1 लाखाची सांत्वन निधी भेट
हेमकांत पाटील यांचे अर्ध्यातून अकाली जाणे त्यांच्या कुटुंबासाठी अतिशय क्लेशदायी होते. 10 वर्षाची मुलगी व 5 वर्षांचा लहानसा मुलगा हे शालेय शिक्षण घेत आहेत. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लागावा या उदात्त हेतूने संस्थेचे सचिव अमोल पाटील व मृणालताई पाटील यांनी आमदार चिमणराव पाटील व माजी नगराध्यक्षा नलिनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाने तात्यासाहेब रू. फ. पाटील शिक्षण मंडळ,देवगावच्या सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आवाहन केले आणि सुमारे एक लाखांची आर्थिक मदत सांत्वन निधी गोळा करून स्व. पाटील यांच्या कुटुंबास दिली.