पातोंडा येथे पवार परीवारावर काळाचा घाला; दोन्ही भावांचा दुर्दैवी निधनाने शोककळा!

पातोंडा ता.अमळनेर (प्रा.भूषण बिरारी )
येथील प्रा. नंदलाल पवार व माध्यमिक शिक्षक जगदिश पवार या दोन्ही भावांचा नाशिक येथे दवाखान्यात उपचारादरम्यान 12 तासांच्या अंतरावर दुर्दैवी निधन झाले.
प्रा.नंदलाल पवार हे एरंडोल महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य व श्री शिवाजी शिक्षण मंडळ पातोंडा चे संचालक होते. त्यांना काही दिवसांपूर्वी बरे वाटत नसल्याने जळगाव येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचाराकरीता नाशिक येथे हलविण्यात आले व तेथे उपचारा दरम्यान दि. 29 रोजी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी भारती पवार ,निवृत्त मुख्याध्यापिका जिजामाता माध्यमिक विद्यालय एरंडोल,मुलगा अमेरीकेत डाॅक्टर असून मुलगी इंजिनीअर आहे. नंदलाल पवार यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असतांनाच त्यांचे लहान बंधू जगदिश पवार उपशिक्षक श्री दत्त विद्या मंदिर पातोंडा यांच्या मोटर सायकलला सावखेडा गावाजवळ अपघात झाला परंतू त्यांना कोणतीही गंभीर दुखापत न झाल्याने अमळनेर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान त्यांच्या मेंदूला मार लागल्याचे निष्पन्न झाल्यावर मेंदूवरील शस्रक्रियेकरीता त्यांना देखील नाशिक येथे हलवण्यात आले. परंतू आज दि. 30 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा व मुलगी असा परीवार आहे. 12 तासांच्या अंतरावर दोन्ही भावांवर नाशिक येथेच कोरोना आजाराच्या पार्शभुमीवर मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला. दोन्ही भावांचा 12 तासाच्या अंतरावर निधन झाल्याने गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
▶️ मागील दोन दिवसात पातोंडा गावावर शोककळा
मागील दोन दिवसात गावात नरडाण्या जवळील अपघातात प्रतिभा वानखेडे ( वय 26 वर्ष) यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पती व एक मुलगा आहे. तसेच विमलबाई लक्ष्मण संदानशिव (वय 56 वर्ष ) , प्रा नंदलाल सिताराम पवार (वय 63 वर्ष) , जगदिश आत्माराम पवार (वय 52 वर्ष) , संजय जगन्नाथ पवार ( वय 58 वर्ष) यांचे दुःखद निधन झाल्याने गावावर एकच शोककळा पसरली आहे.