अमळनेर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थिनींना मिळणार बोर्ड परीक्षेत 15 गुण

अ.भा. साहित्य संमेलनात विद्यार्थिनींचा कृतीयुक्त सहभाग
अमळनेर- शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात ‘अहवाल लेखन’, वृतांत लेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन शिकवले जाते, मात्र याची प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती अर्थात प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना येत नाही. हा अनुभव यावा या उद्देशाने येथे नुकत्याच झालेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या. विशेष म्हणजे विद्यार्थिनींनी केलेल्या अहवाल लेखन संकलनाची दखल घेऊन दहावीच्या विद्यार्थिनींना बोर्ड परीक्षेत शाळांतर्गत भाषेच्या तोंडी परीक्षेत 15 गुण तर बारावीच्या विद्यार्थिनींना दहा गुण दिले जाणार आहेत. या आगळ्यावेगळ्या शैक्षणिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या प्राचार्या गायत्री भदाणे यांनी मराठी विषय शिक्षक उमेश काटे यांनी मांडलेल्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत, सुनील पाटील, सुनील साळुंखे, सुरेश पाटील डी बी वाल्हे, जी पी हडपे, दीपककुमार पाटील, नितीन पाटील, आर आर पाटील, किरण पाटील, कल्याण नेरकर, एन बी खंडारे, नीलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनात कृतीयुक्त सहभाग नोंदविला. संमेलनात प्रत्येक बाबींच्या नोंदी आपल्याकडे केल्या. साहित्य संमेलनाचे उद्घाटन, संमेलनाध्यक्षांचे भाषण, स्वागत अध्यक्ष यांचे मनोगत, कवी संमेलन, कवी कट्टा, परिसंवाद कथाकथन, साहित्यिक- श्रोते यांच्या प्रतिक्रिया अशा सर्व बाबींच्या नोंदी अहवाल लेखनच्या माध्यमातून आपल्याकडे घेतल्या. या सर्व नोंदी एकत्रित करून हा संपूर्ण “अहवाल प्रस्ताव हस्तलिखित स्वरूपा” मध्ये शाळेतील मराठी, हिंदी, इंग्रजी विषय शिक्षकांकडे सादर केला. बोर्ड परीक्षेत शाळा अंतर्गत असलेल्या तोंडी परीक्षेत या दहावीच्या विद्यार्थिनींना प्रत्येकी भाषा विषयाला पाच गुण अर्थात 15 गुण दिले जाणार आहेत. तर बारावीच्या विद्यार्थिनींना मराठी, इंग्रजी या विषयात प्रत्येकी पाच असे दहा गुण दिले जाणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी आबा महाजन, साने गुरुजींच्या पुतणी सुधाताई साने, कवियत्री माया धुप्पड, कवी शशिकांत हिंगोणेकर, कवी विलास सिंदगीकर, कवी रमेश पवार कवी रमेश धनगर आदी साहित्यिकांशी विद्यार्थिनींनी हितगुज साधले. काळाची पाऊले ओळखत ” विविध कौशल्य” विकसित करण्याची सुवर्णसंधी या साहित्य संमेलनात या विद्यार्थ्यांनीना देण्यात आली.
नवोपक्रम ठरत आहे फायदेशीर!
अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची ओळख व्हावी तसेच मराठी भाषेचे शब्दवैभव किती विविधांगी आहे, हे लक्षात यावे यासाठी पाठ्यपुस्तकात ‘वाचा’, ‘चर्चा करूया’, ‘गंमत शब्दांची’, ‘खेळूया शब्दांशी’, ‘लिहिते होऊया’, ‘शोध घेऊया’, ‘खेळ खेळूया’, ‘माझे वाचन’, ‘चला संवाद लिहूया’, ‘भाषासौंदर्य’ यांसारख्या अनेक भाषिक कृती दिलेल्या आहेत. पाठ्यपुस्तकातील हे विविध ‘उपक्रम’ व ‘प्रकल्प’ यांतुन मिळवलेल्या ज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ते ज्ञान स्वप्रयत्नाने पक्के करता यावे. तसेच भाषा हे नवनिर्मितीचे मुख्य साधन आहे. या नवनिर्मितीचा आनंदही विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी हा नवोपक्रम यशस्वी ठरला आहे. या उपक्रमाचे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, मार्गदर्शिका शीलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, प्रा श्याम पवार, मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे यांनी अभिनंदन केले आहे.
—————–