स्वतःला झोकुन दिल्यास मिळते अपेक्षित यश!-आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे प्रतिष्ठा अल्पकाळासाठी तर माणुसकी चिरकाल!-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील

0

▶️ अमळनेरात झाला खान्देशातील कर्तृत्ववानाचा महासन्मान
अमळनेर (प्रतिनिधी) आजच्या तरुणांनी केवळ “स्पर्धा परीक्षा” टार्गेट ठेवू नका. अनेक तरुण वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेच्या वाऱ्या करतात त्यापेक्षा प्लॅन बी नेहमी तयार ठेवा. प्रत्येकाची लायकी वेगवेगळी असते त्यानुसार वेगवेगळ्या अनेक क्षेत्रात आपले करिअर करा. तन-मन-धनाने त्यात स्वतःला झोकुन द्या, अपेक्षित यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा मौलिक सल्ला आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे (नागपूर) यांनी केले. उत्कर्ष खान्देशी अधिकारी व तालुक्यातील विविध विकास मंचातर्फे झालेल्या “कर्तृत्वाचा महासन्मान” कार्यक्रमात ते बोलत होते.


येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मुंबई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांच्या विशेष उपस्थितीसह नाशिक जीएसटी विभागाचे उपायुक्त मधुकर पाटील, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, खा शि मंडळाचे माजी कार्याध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय भदाणे, खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे, प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ एस. आर. चौधरी, निवृत्त उपप्राचार्य डॉ एस.ओ माळी, मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेले डॉ घनश्याम पाटील (फ्लाईंग ऑफिसर), ऋतुजा पाटील (मुख्याधिकारी), प्रसाद चौधरी (सहायक आयुक्त राज्यकर), रोहित पवार (सहाय्यक अभियंता वर्ग-2), राहुल पारधी, नेहा पाटील, विवेक सोनवणे (विक्रीकर निरीक्षक), सागर पटेल (पशुधन विकास अधिकारी), रामदास चव्हाण (विकास अधिकारी), हर्षदा देसले (कृषीच्या डेप्युटी डायरेक्टर), माधुरी पाटील (पीएसआय), जयवंतराव येशीराव (पीएसआय), घनश्याम काटे (पोलीस) यांच्यासह विविध पदांवर नियुक्त झालेले खान्देशातील सुमारे 75 कर्तृत्ववान तरुण-तरुणींचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्यात वाचन संस्कृती वाढावी या पार्श्वभूमीवर स्वर्गीय महेश पन्नालाल थोरात यांच्या स्मृती प्रीत्यर्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात (मुंबई) यांच्यातर्फे “फिरते वाचनालय” चाही शुभारंभ करून प्रातिनिधिक स्वरूपात दहा गावांना पुस्तकांच्या बॅगा देण्यात आल्या. तसेच सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे “चला व्यक्तिमत्व विकास घडवूया” या उपक्रमाचे उद्घाटनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. आयएएस राजेश पाटील म्हणाले की, प्रतिष्ठा ही अल्पकाळासाठी असते, मात्र माणुसकी ही चिरकाल टिकते. म्हणून माणूस म्हणून जगायला शिका. आपल्या जबाबदाऱ्यांचे भान नेहमी ठेवा. आपल्या क्षमतांना योग्य असे पूरक वातावरण मिळाले तर, अपेक्षित यश मिळते. आपण निवडलेल्या क्षेत्रात विधायक काम करायला शिका व त्या कार्यक्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविण्याचे आवाहन केले. उत्कर्ष खानदेशी अधिकारी ग्रुप चे समन्वयक तथा नागपूर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार यांनी प्रास्ताविक केले. युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील व उमेश काटे सूत्रसंचालन केले. डी ए धनगर यांनी आभार मानले. तालुक्यातील विविध विकास मंच, शिवशाही फाउंडेशन, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अंबरीश ऋषी टेकडी ग्रुप, साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, पी टी ए कोचिंग क्लासेस, माजी प्रतापियन्स प्रबोधिनी, सीसीएमसी प्रताप कॉलेज, प्रताप तत्त्वज्ञान केंद्र यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!