खान्देशातील कर्तृत्ववान रत्नांचा अमळनेरात २२ रोजी होणार महासन्मान

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील युवकांनी स्व कष्टाने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेची व बुद्धीमत्तेची पताका फडकवली आहे, पर्यायाने यामुळे खान्देशवासीयांची मान उंचावली आहे. अशा कर्तृत्ववान रत्नांचा सन्मान सोहळा उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुक्यातील विविध विकास मंचातर्फे शनिवारी (ता.२२) सकाळी साडे आठला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे.
नागपूर आयकर विभागाचे आयुक्त संदीपकुमार साळुंखे व मुंबई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांच्या हस्ते खान्देशातील या कर्तृत्ववान तरुणांचा सन्मान केला जाणार आहे. यावेळी तालुक्यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी स्वर्गीय महेश पन्नालाल थोरात यांच्या स्मृती प्रीत्यर्थ “फिरते वाचनालय” चाही शुभारंभ होणार आहे. येथील सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे “चला व्यक्तिमत्व विकास घडवूया” या उपक्रमाचे उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील वरीष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैयालाल थोरात, नाशिक जीएसटी विभागाचे उपायुक्त मधुकर पाटील, प्रांताधिकारी महादेव खेडकर, पोलीस उपाधीक्षक सुनील नंदवाळकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय भदाणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ एस. आर. चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन उत्कर्ष खानदेशी अधिकारी ग्रुप चे समन्वयक तथा नागपूर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार, जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार, युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील यांनी केले आहे.
▶️ नाव नोंदणीचे आवाहन:-
अमळनेर तालुक्यातील जे युवक व युवतीचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन विविध पदांवर निवड झाली असेल अशा सर्वांचा आईवडिलांसमवेत संदीपकुमार साळुंखे व मुंबई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे, तरी युवक युवतींनी उमेश काटे (9423579827) व महेंद्र पाटील (9764265866)यांच्याकडे नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
