परस्परांची काळजी घेऊन साधेपणाने होळी, धूलिवंदन साजरे करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

0

▪️कोरोनावरील औषधोपचार, सुविधांमध्ये महाराष्ट्र मागे नाही.

मुंबई (वृत्तसंस्था)परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत, येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतो आहे. त्यासाठी रविवार (दि.28) पासून दि. 15एप्रिल 2021 पर्यंत रात्रीच्या ( रात्री 8 ते सकाळी 7 वा. पर्यंत) वेळी जमावबंदी लागू केली आहे. या वेळेत उद्याने, चौपाट्या अशा सार्वजनिक ठिकाणीही एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्क वापरणे, हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन अत्यावश्यक आहे. गृह विभागानेही हे सण साधेपणाने साजरे करावेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचेही आदेश काढण्यात आले आहेत.

या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन सण-उत्सव साजरे करावेत. होळी, धूलिंवदन सण यातून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेऊया. निसर्गही रंगाची उधळण करतो. आपल्या आयुष्यातही रंग भरतो. रंग आनंद, सुख-समृद्धी घेऊन येतात. त्यामुळे रंगाचा सण साजरा करतानाही आपल्याला परस्परांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गर्दी नकोच. एकत्र येणे टाळून कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखणे या देखील परस्परांसाठी शुभेच्छा आहेत. सदिच्छा आहेत, असे मानून सण साजरे करावेत. धार्मिक व सांस्कृतिक परंपरा देखील अशाच पद्धतीने नियम पाळून व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सणांच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!