आदर्शदायी:कोळपिंप्री येथे राहुलने दिला,विधवा वहिनींसह 3 मुलांना आधार!

0


पारोळा (प्रतिनिधी)”तालुक्यातील कोळपिंप्री येथील राहुलने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून तिच्या जीवनाला आधार दिला अन विशेष म्हणजे संपूर्ण जबाबदारी घेत तीन मुलांसाठी “बाप” ही झाला. नवदांपत्य राहुल विनोद काटे (वय-३१) व अनिता काटे (वय-२८) यांच्या पुरोगामी विचारांनी मराठा समाजात एक आदर्श घालून दिला आहे.
कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील विनोद आसाराम काटे यांच्या कुटुंबात क्रूर नियतीने गेल्या चार वर्षात तीन पिढ्यांतील चक्क चार सदस्य कुटुंबापासून हिरावून नेले आहेत. गेल्या वर्षी कुटुंबाचा आधारवड असलेला बत्तीस वर्षीय युवा शेतकरी संभाजी काटे याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याची ही अचानक झालेली “एक्सिट” अनेकांच्या मनाला चटका लावून गेली होती. ज्यावेळी संभाजी चे निधन झाले त्याच्या पश्चात विद्या व वैभवी या जुळ्या मुली तर पत्नी अनिता या सात महिन्याच्या गर्भवती होत्या. जन्म होण्यापूर्वीच त्या गर्भातील “बाळाचा बाप” या क्रूर काळाने आपल्यातून हिरावून नेला होता. अशा वेळी लहान दिर राहुल ने धिर दिला. त्यानंतर आठ महिन्यांपूर्वी अनिता यांनी “मयंक” या गोंडस बाळाला जन्म दिला. भावाच्या निधनानंतर घरावर दुखाचा डोंगर कोसळला होता. अशात विधवा वहिनी, जुळ्या मुलीसह आठ महिन्याचा पुतण्या “मयंक” डोळ्यासमोर होते. त्यांचं दुख पहावत नसलेल्या दिराने विधवा वहिनीला पुन्हा जगण्याचा आधार देण्यासाठी तयार झाला. प्रतिकूल परिस्थितीत आपली सून समाजात विधवा म्हणून वावरण्यापेक्षा सौभाग्यवती म्हणून घरात सुनकन्या म्हणून वावरावी आणि नेहमी तिच्या कपाळावरचं कुंकु हसत खेळत असावं असा निर्णय कुटुंबियांनी घेतला. आजही भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला अनन्य साधारण महत्व आहे. पती-पत्नी हे संसाररूपी रथाचे दोन चाक मानले जातात. त्यात एकही चाक तूटलं की जीवन असह्य होऊन जातं. पण या सगळ्यावर या तरुणाने कौतूकास्पद कामगिरी केली आहे. आपल्या विधवा वहिनीवर कठीण प्रसंग येऊ नये, जुळ्या मुलीसह आठ महिन्याचा पुतण्याला वडिलांचे प्रेम कमी पडू नये म्हणून एका मोठ्या मनाच्या तरुणाने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. आपली स्वतःची भावी स्वप्ने बाजूला सारत राहुल काटे याने आपली विधवा वहिनी अनिता हिच्याशी आज कोळपिंप्री येथील भवानी मंदिर परिसरात नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विवाह केला. लग्नाच्या रेशिमगाठी बांधत विधवा वहिनी आणि दिर विवाह बंधनात अडकले. त्यांच्या या विवाहाचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे.
▶️ शिवशाही फाऊंडेशनकडून स्वागत
कोळपिंप्री गावाला पुरोगामी विचारांचा वारसा आहे. पूर्वीपासून सत्यशोधक समाजांच्या विचारांनी घडलेले हे गाव आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल ने घेतलेला निर्णय अतिशय अभिमानास्पद आहे. मराठा समाजामध्ये अशा निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून ती काळाची गरज आहे. यावेळी शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे व सचिव उमेश काटे यांनी नववधू अनिता काटे व वर राहुल काटे यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!