उन्हाळी सुट्टीत राबविला जातोय “शाळा- आपल्या दारी” उपक्रम!

▶️अमळनेर येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचा पुढाकार
अमळनेर (प्रतिनिधी) पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धतीने शाळा भरवली जायची, त्यानंतर शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहचण्यासाठी गावात शाळा सुरू झाल्या. बदलत्या काळानुसार “शाळेत गाव” अर्थात विद्यार्थीसह पालकांचा जनसंपर्क शाळेशी वाढविण्यासाठी अनेक नवनवीन शालेयपोयोगी उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर येथील सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उन्हाळी सुट्टीत राबविलेल्या “शाळा- आपल्या दारी” या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शाळेत वर्षभर विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकासासाठी विविध क्रीडा स्पर्धा सह सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या सर्व गोष्टीची माहिती पालकांपर्यंत पोहचावी तसेच पालकांच्या विविध सूचना, समस्या यांचे निरसन व्हावे. तसेच ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या शेतकरी पालक, शेतमजूर पालक व गरीब, गरजू विद्यार्थ्यांना घरबसल्या नवीन शाळा प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी “शाळा – आपल्या दारी” हा उपक्रम यशस्वी होत आहे. यासाठी नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड, शाळेच्या प्राचार्या गायत्री भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. शाळेचे जेष्ठ शिक्षक व्ही सी पाटील, कल्पना महंत, लता पवार, निलिमा पाटील, जी पी हडपे, उमेश काटे व एन बी खंडारे हे सर्व शिक्षक, शिक्षिका शहरातील विविध भागात तसेच ग्रामीण भागातील रढावण- राजोरे, हेडावे, सुंदरपट्टी, खेडी, खोकरपाट, बहादरवाडी, हिंगोणे यासह अनेक गावांमध्ये जात आहे. घरबसल्या नवीन शाळा प्रवेश प्रक्रिया होत असल्याने पालकांचा वेळ व पैसा दोन्ही वाचत आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी काय करावे लागेल याची ही माहिती सुज्ञ नागरिकांकडून घेतली जात आहे. या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी पी डी धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे, शापोआ अधीक्षक भुपेंद्र बाविस्कर यांनी कौतुक केले आहे.