कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी ‘देसी’ अभ्यासक्रमाचा शुभारंभ

0

चोपडा(प्रतिनिधी) नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कृषि तंत्र विद्यालय, अडावद येथे सुरु होणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमाच्या (DAESI) दुसऱ्या बॅचचा शुभारंभ चोपडा येथे दि. २ रोजी संपन्न झाला. 
        मॅनेज हैदराबाद, वनामती नागपूर, आत्मा जळगाव आणि कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत भगिनी मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय अडावद यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात भविष्यात सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधानसभा अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विचार मांडले.
            कार्यक्रमाचे उद्घाटन जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले. बीजभाषण वक्ते संभाजीराव ठाकूर (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा जळगाव) यांनी शेतीला जैविक शेती शिवाय पर्याय नाही आणि तसेच शाश्वत शेती करण्यासाठी शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभे करावेत,असे त्यांनी आपल्या भाषणात कृषी निविष्ठा दुकानदार यांना मार्गदर्शन केले.
     तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले अनिल भोकरे (उपसंचालक कृषी विभाग जळगाव), कुरबान तडवी (प्रकल्प उपसंचालक जळगाव), जाधवर (उपविभागीय कृषी अधिकारी कृषी विभाग अमळनेर), तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे आणि डॉ. हेमंत बाहेती (समन्वयक कृषी विज्ञान केंद्र जळगाव) यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. आपल्या भाषणात बोलताना भोकरे साहेबांनी देसी प्रोग्राम कसा सुरू झाला का राबवला गेला व त्याचे महत्त्व काय हे प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रकल्प उपसंचालक तडवी यांनी देसी अभ्यासक्रमाचे स्वरूप व परीक्षा पद्धती व प्रात्यक्षिक भेटी याबद्दल सविस्तर माहिती प्रशिक्षणार्थीना दिली.
            कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून चोपडा तालुका बियाणे खते व औषधे असोसिएशनचे अध्यक्ष नेमीचंद जैन, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, व्हा. चेअरमन प्रवीण गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी तसेच चोपडा परिसरातील प्रयोगशील शेतकरी यांची विशेष उपस्थिती होती. पदविका अभ्यासक्रमाचे कृषि निविष्ठा प्रशिक्षणार्थी ७० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
        कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी यांनी ‘सेंद्रिय शेती काळाची गरज’ यावर प्रकाश टाकला. तर आशिष गुजराथी यांनी आपल्या मनोगतात ‘कमी पाण्यावर कमी औषधांचा वापर करून शेतीचा खर्च कसा कमी करता येईल आणि शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल’ याविषयी आपले विचार मांडले.
         समाजकार्य महा विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराथी, राजेंद्र महाजन (प्राचार्य, ललित कला केंद्र) तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि भगिनी मंडळ संस्थेचे शिक्षक व शिक्षेकेतर  कर्मचारी यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल माळी (प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, अडावद) यांनी केले.  कृषि तंत्र विद्यालय अडावद येथील शिक्षकवर्ग सौ. सीमा पाटील, किरण साळुंके व प्रकाश धनगर यांनी कार्यक्रम आयोजनात विशेष सहकार्य केले.  सेवानिवृत्त ज्ञानेश्वर पाटील (सुलभकर्ता, देसी अभ्यासक्रम केंद्र अडावद) यांनी आभार व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!