अधिकारी पवार दांपत्याला मिळाली पदोन्नती !

▶️ कपिल पवार हे प्राधिकरण् चे उपसंचालक तर स्नेहाताई पवार या उप मुख्य कार्यकारी अधिकारी
जळगांव(प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिकेचे वित्त व लेखा अधिकारी कपिल जयराम पवार यांची नागपुर येथील महानगर प्रदेश विकास प्राधिकरण् च्या उपसंचालक या पदावर पदोन्नती झाली आहे. तर श्री पवार यांच्या पत्नी तथा धरणगाव येथील गट विकास अधिकारी स्नेहाताई पवार यांची जळगाव येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) पदी पदोन्नती झाली. अधिकारी पवार दांपत्याला मिळालेल्या या पदोन्नतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्री पवार यांनी महापालिकेचा अतिशय विस्कटलेला कारभार सुस्थितीत आणला. कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन व पेन्शन योग्य नियोजन करून सुरळीत करण्यात त्यांना यश आले. शिक्षकांचे दीड- दीड वर्षांचे थकलेले वेतन त्यांनी सुरळीत करून मनपा ची अर्थ विभागाची गाडी रुळावर आणली होती. मनपाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची समन्वय साधत अनेक विषय मार्गी लावण्यात त्यांना यश आले होते. श्री पवार यांनी केंद्र लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “भगीरथ भारताचा भूगोल” या पुस्तकाचे लिखाण केले आहे. सध्या या पुस्तकाची चौथी आवृत्ती बाजारात उपलब्ध आहे. त्यांनी खान्देशातील सर्व अधिकाऱ्यांना एकत्र करीत “उत्कर्ष खान्देशी अधिकारी ग्रुप” तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवित असतात. दरम्यान स्नेहाताई पवार यांनीही धरणगाव येथे कार्यरत असताना आपल्या पदाला योग्य न्याय दिला होता. त्यांनी तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले होते. महिला अधिकारी म्हणून आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटविला आहे. पवार दांपत्य हे पातोंडा (अमळनेर) येथील मूळ रहिवासी असून आपल्या मातृभूमीशी नाड जुळवत “पातोंडा परिसर विकास मंच” ची स्थापना केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल उत्कर्ष खान्देशी अधिकारी ग्रुप, पातोंडा परिसर विकास मंच व शिवशाही फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. पवार दांपत्य हे आपल्या अधिकारी पदाची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळून विविध उपक्रमात ते अग्रस्थानी असतात हे विशेष!
