लोणी ग्रुप विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर काटे सेवानिवृत्त

▶️ ३६ वर्षाची केली प्रदीर्घ सेवा, मान्यवरांच्या उपस्थितीत सेवापूर्ती सोहळा
पारोळा (प्रतिनिधी) शिक्षक हे आयुष्यभर ज्ञानदानाच्या कार्यातून उद्याची उज्वल भविष्य पिढी तयार करीत असतो. विद्यार्थीप्रिय शिक्षक होणे, हीच या आदर्श शिक्षकाच्या कार्याची पावती असते, असे मत राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सदानंद भावसार यांनी व्यक्त केले. लोणी ग्रुप (ता.पारोळा) येथील लोणी ग्रुप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित किसान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर आत्माराम पाटील(काटे) हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून तेच निवृत्त झाले. निवृत्तीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. लोणी ग्रुप शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. भागवतराव पाटील व संस्थेच्या सचिव साधना पाटील यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य आदर्श शिक्षक सदानंद भावसार, कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. रावसाहेब अविनाश शिंदे, कुसुंबा विद्यालयाचे प्राचार्य किशोर पाटील, शिक्षण तज्ञ प्र. ह.दलाल, राष्ट्रीय विद्यालयाचे माजी संचालक सुधीर पाटील, माध्यमिक पतपेढी चे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनवणे, उंबरखेड विद्यालयाचे प्राचार्य आर आर पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मनोहर पाटील हे १९८६ मध्ये लोणी ग्रुप (ता.पारोळा) येथील किसान माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक म्हणून रुजू झाले. आपल्या अध्यापन कौशल्याने त्यांनी अल्पावधीतच विद्यार्थ्यांची मने जिंकली. त्यांची आपल्या विषयावर जबरदस्त पकड होती. कठीण भाग सोप्या पध्दतीने सांगत असल्याने ते विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक झाले. अध्यापणाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात ते अतिशय पारंगत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर मुख्याध्यापक पदाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली. त्यांनी ही त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवत शाळेचा नावलौकिक वाढविला. त्यांचे अनेक माजी विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. ते ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच निवृत्त झाले. कार्यक्रमाच्या वेळी प्रा. रावसाहेब शिंदे,प्राचार्य किशोर पाटील,शिक्षण तज्ञ प्र. ह.दलाल,सुधीर पाटील,संभाजी पाटील,प्राचार्य आर आर पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. शिवचरण पवार यांनी सूत्रसंचालन तर श्रीमती राजश्री पाटील यांनी आभार व्यक्त केले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी,नातेवाईक, पालक, ग्रामस्थ, आजी- माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.