शिरुड येथील डाक विभागाचा बेभरोसे कारभार

अमळनेर (प्रतिनिधी) शिरुड (ता.अमळनेर) येथील पोस्ट ऑफिस चा कारभारा विषयी लोकात नाराजी आहे. कारण तेथील पोस्टमास्तर वेळेवर कागदपत्र वितरण करत नाही असा अनुभव आल्यानंतर डी ए धनगर यांनी डाक निरीक्षक भरत चौधरी यांच्याकडे तक्रार केली आहे.
गावातील अनेक लोकांची पोस्ट खाते व्यवस्थित काम करत नसल्याबद्दल गैरसोय होत आहे. ग्रामीण लोकवस्तीमध्ये डाक विभागाचे नातं अतूट आहे. मोबाईलच्या जमान्यात सुद्धा पोस्ट खात्याने आपली विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. त्यामुळे खेड्यातील लोकांचा अजूनही पोस्ट खात्यावर प्रचंड भरोसा आहे. शहरापासून लांब असलेल्या गावात मनीऑर्डर, अंतर्देशीय पत्र, पोस्टाचे तिकीट लावून पाकीट पाठवणे आधी गोष्टी सतत घडत असतात. परंतु शिरूड येथील पोस्टमास्तर गावात दिसत नाही. गावातीलच एखाद्या व्यक्तीला धरून त्याच्याकडे गावातील पोस्टात आलेली पत्रे वितरणाचे काम देतो. काही वेळेस महत्त्वाची कागदपत्रे वेळेवर मिळत नाही. त्यामुळे संबंधितांना आलेल्या अडचणींना तोंड द्यावे लागते. खरंतर पोस्ट ऑफिस आणि ग्रामीण जीवन यांना जोडणारा दुवा म्हणजे पोस्ट मास्तर होय. आजही पोस्ट खाते हे ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण शिरूड येथे पोस्ट खात्याच्या सेवा मिळण्यासाठी वणवण भटकावे लागते. आंतरदेशीय पत्र, पोस्टाचे तिकीट. मनीऑर्डर, पाकीट इत्यादी प्राथमिक बाबी गावकऱ्यांना उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गावातील नागरिकांची तीव्र नाराजी आहे. गरीब, गरजू व होतकरू तरुणांना मुलाखत पत्र, परीक्षा प्रवेश पत्र, नियुक्ती आदेश व इतर महत्त्वाच्या गोष्टी वेळेवर मिळाल्या नाहीत तर त्यांना हक्काच्या मिळणाऱ्या नोकरीच्या संधी पासून संबंधित कष्टकऱ्यांची मुले वंचित राहू शकतात याची जाणीव ठेवून योग्य पद्धतीने सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात आली आहे. मोबाईलच्या जमान्यातही पोस्ट खात्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी आर्त साद या पत्रान्वये देण्यात आली आहे. तरी संबंधितांनी गांभीर्यपूर्वक या गोष्टींचा विचार करून सेवा सुरळीत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.