शैक्षणिक वातावरण सुदृढ करण्यासाठी विद्यार्थ्यांचे लसीकरण गरजेचे!-माजी मंत्री विजय पाटील

▶️ अमळनेरला लसीकरण शिबीर
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना काळात शैक्षणिक वातावरण सुदृढ करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे काळाची गरज आहे, यासाठी सर्वांनी एकजूट होऊन आरोग्य व शिक्षण विभागाला सहकार्य करावे असे आवाहन राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी केले. येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलमध्ये झालेल्या लसीकरण शिबीराच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.
राज्यातील १५ ते १८ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे १०० % लसीकरण करणेबाबत शासनाचे आदेश आहेत. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी पत्रक काढले आहे, त्यानुसार तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही शालेय प्रशासनाची असल्याने येत्या २ ते ३ दिवसांत लसीकरणाचे काम तात्काळ करावे. शहरी भागातील शाळेचे वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन, व ग्रामीण भागातील शाळेचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीष गोसावी यांच्याशी समन्वय साधून वेळेत १०० टक्के लसीकरण पूर्ण करावे याबाबत दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन यांच्या निर्देशान्वये तसेच प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील व संस्थेचे मानद संचालक प्रा सुनील गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील १५ ते १८ वर्ष वयोगटातील उपस्थित १०० टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यात ८ वी ते १२ वी च्या पावणेदोनशे विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. यावेळी प्राचार्य पी.एम.कोळी, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस ए बाविस्कर, उमेश काटे आदी उपस्थित होते. लसीकरणसाठी आरोग्य सेविका सगुणा बारेला, आरोग्य सेविका वंदना पाटील, आशा सेविका प्रतिभा सावळे, आशा सेविका शीतल बोरसे यांचे पथक उपस्थित होते. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीचे सहकार्य लाभले.
