महिला मंडळ शाळेत विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी!

चोपडा (प्रतिनिधी) येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात इनरव्हील क्लब ऑफ चोपडाच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. शहरातील प्रसिद्ध दंतवैद्य डॉ. शेखर वारके, डॉ. नीरज पोतदार, डॉ. मोनाली चित्ते यांनी विद्यालयातील इ. ५ वीतील सुमारे शंभराच्या वर विद्यार्थ्यांची तपासणी केली. दोष आढळलेल्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत उपचार दिले जाणार असल्याचेही यावेळी सांगितले. यामध्ये मुलांना दातांची काळजी व निगा या विषयी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना टूथपेस्टचे वितरण केले. दातांची घ्यावयाची काळजी संदर्भात चित्रफिती दाखवण्यात आल्या.
याप्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ चोपडाच्या प्रेसिडेंट पुनम गुजराथी, सेक्रेटरी मीना पोतदार, प्रोजेक्ट चेअरमन ज्योती वारके व क्लबच्या सदस्यांसह मुख्याध्यापक सुनील चौधरी हे उपस्थित होते. या कामी विद्यालयातील शिक्षक विजय पाटील, भावेश लोहार, यशोदा शिरसाठ यांच्यासह मदतनीस संजय पाटील व बाळासाहेब भालेराव यांचे सहकार्य लाभले.